ऋषीकेश मुळे, भिवंडी

भाजपचे विद्यमान खासदार कपील पाटील यांच्याविषयी शिवसैनिकांच्या मनात असलेल्या नाराजीला खतपाणी घालत ‘आपलं ठरलय’ असा संदेश गल्लोगल्ली पोहोचविणाऱ्या विरोधकांच्या प्रयत्नांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी फारशी किंमत दिली नसल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले. भिवंडी शहरातील मुस्लीमबहुल मतदार आणि शिवसैनिकांमधील नाराजीच्या बळावर काहीही झाले तरी पाटील यांना यंदा धक्का द्यायचा असा चंग काँग्रेसने बांधला होता. मात्र, या मतदारसंघातील ग्रामीण पट्टय़ासह कल्याण पश्चिम, बदलापूर, मुरबाड परिसरातील शहरी पट्टय़ाने पाटील यांना चांगली साथ दिल्याचे आता स्पष्ट होत आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच भाजपचे उमेदवार कपील पाटील यांनी आघाडी घेतल्याने येथील चुरस कमी झाल्याचे पाहायला मिळाले. ठाणे जिल्ह्य़ातील तीन लोकसभा मतदारसंघांपैकी भिवंडीत सर्वाधिक चुरस असल्याची चर्चा अगदी सुरुवातीपासून होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कपील पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिवसैनिक त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे प्रचारात पाटील जेथे जेथे जात तेथे शिवसैनिकांच्या नाराजीचा त्यांना तोंड द्यावे लागत असे. अखेर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेत्यांची मनधरणी करावी लागली. भिवंडी ग्रामीणचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांना पाटील यांच्यासोबत प्रचारात उतरवून शिंदे यांनी या ठिकाणी अपशकुन होणार नाही यासाठी बरेच प्रयत्न केले. मतमोजणी सुरू होताच अगदी पहिल्या फेरीपासून कपील पाटील यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. काही फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे सुरेश टावरे यांना आघाडी घेता आली असली तरी त्यांना पाटील यांचे मताधिक्य कमी करता आले नाही. या मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, २० फेऱ्यांमध्ये पाटील यांनी एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळल्याने ही निवडणुक एकतर्फी झाल्याचे स्पष्ट झाले.