News Flash

भिवंडीत काँग्रेस, भाजपचा प्रचार थंडच

भिवंडी ग्रामीण पट्टय़ात येणाऱ्या वाडा, कुडुस, अंबाडी पडघा, गणेशपुरी या परिसरात काँग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य नाही.

(संग्रहित छायाचित्र)

रमेश पाटील

एकीकडे कार्यकर्त्यांचा अभाव तर दुसरीकडे अंतर्गत वादाचा फटका

भिवंडी लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.  प्रचारासाठी केवळ आठ दिवस राहिले असतानाही ग्रामीण भागात अजून कुठल्याच राजकीय पक्षांनी जोर धरलेला नाही. निवडणुकीत चुरस असलेल्या काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांचा अभाव तर भाजपमध्ये अंतर्गत वादामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगण्यात येत आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी पूर्व आणि पश्चिम तसेच ग्रामीण त्याचप्रमाणे कल्याण पश्चिम, मुरबाड व शहापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामधील भिवंडी ग्रामीण, शहापूर व मुरबाड या तीन विधानसभा मतदारसंघातील बराचसा भाग हा ग्रामीण आदिवासी परिसरात येतो. या ग्रामीण भागात गेल्या पाच वर्षांत झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायती व ग्रामपंचायत या सर्व निवडणुकीत काँगेसला मोठय़ा प्रमाणावर पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या पक्षाकडे कार्यकर्त्यांचा मोठय़ा प्रमाणावर अभाव आहे.

भिवंडी ग्रामीण पट्टय़ात येणाऱ्या वाडा, कुडुस, अंबाडी पडघा, गणेशपुरी या परिसरात काँग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य नाही.  भाजपचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्यावरची शिवसैनिकांची नाराजी दूर करण्यात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना अजूनपर्यंत यश आलेले नाही.

अंबाडी येथे भाजपचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी नुकताच आयोजित केलेल्या मेळाव्यात अंबाडी परिसरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी बॅनरवर शिवसेना पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र व नावे नसल्याचे कारण पुढे करून हा मेळावाच होऊ दिला नाही.  वाडा तालुक्यात गारगांव परिसरातील शिवसैनिक आजही खासदार कपिल पाटील यांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. कुणबी सेनेने पाठिंबा दिल्याचे युतीकडून बोलले जात असले तरी आजतागायत कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटीलसह एकही कुणबी सेनेचा कार्यकर्ता युतीच्या प्रचारात   दिसत नाही.  कुठल्याचे पक्षाचे वर्चस्व नसलेल्या या मतदारसंघात भाजप, शिवसेना युतीचे उमेदवार कपिल पाटील व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्यातच लढत रंगेल, मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कार्यकर्त्यांची अधिक फळी कोण उभी करण्यात यशस्वी होतो यावर सर्व काही अवलंबून आहे, राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

ग्रामीण भागात काँग्रेस दुबळी

काँग्रेसला साथ देणारे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांतील कार्यकर्त्यांनीही अजूनपर्यंत प्रचारात झोकून दिलेले नाही. वाडा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावरच भाजपने सभापती व उपसभापती या दोन्ही पदे मिळवली आहेत. अशा अनेक कारणांमुळे काँग्रेसला ग्रामीण भागात प्रचारासाठी कार्यकर्त्यांची मोठी उणीव जाणवत आहे.

मेळाव्यावर सेनेचा बहिष्कार

वाडा नगरपंचायतीमध्ये शिवसेना व काँग्रेस यांची युती आहे. शिवसेनेकडे नगराध्यक्षपद तर काँग्रेसकडे उपनगराध्यक्षपद आहे. गेल्या आठवडय़ात वाडा येथे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित युतीच्या मेळाव्यावर शिवसेनेच्या नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांनी बहिष्कार टाकून आम्ही या निवडणुकीत युती सोबत नसल्याचे दाखवून दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:38 am

Web Title: bhiwandit congress bjp propaganda cool
Next Stories
1 अमराठी उमेदवारांचा ‘मी मराठी’चा घोष
2 वरळी कोळीवाडय़ाचाही बंडाचा झेंडा!
3 प्रचाराच्या चित्रफितीवरून राष्ट्रवादी आक्रमक
Just Now!
X