बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून नशीब आजमावणारे कन्हैयाकुमार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हे एक लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. तर राष्ट्रीय जनता दल- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार तन्वीर हसन यांच्यामुळे कन्हैयाकुमार यांना मिळणाऱ्या मतांचे विभाजन झाले आणि याचा फायदा भाजपाला झाल्याचे दिसते.

बेगुसराय मतदारसंघात भाजपाचे उमेदवार अणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे तन्वीर हसन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैयाकुमार यांच्यात तिरंगी लढत आहे. कन्हैयाकुमार हे नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) घोषणाबाजीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. भाजपाने गिरीराज सिंह यांना मतदारसंघ बदलून बेगुसरायमध्ये पाठविल्याने ते सुरुवातीला नाराज होते. पण नंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची नाराजी दूर केली आणि ते लढण्यास तयार झाले. कन्हैयाकुमार हे रिंगणात असल्याने बेगुसराय मतदारसंघाकडे राष्ट्रीय पातळीवरील माध्यमे आणि राजकीय तज्ज्ञांचे लक्ष होते.

तीन वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला होता. या वादात कन्हैयाकुमार, शेहला रशीद, उमर खालिद हे नवे नेतृत्व उदयाला आले. यापैकी कन्हैयाकुमार हा आपले मूळ गाव बेगुसरायमधून निवडणूक लढवत होते. गुरुवारी झालेल्या मतमोजणीत कन्हैयाकुमार यांचे स्वप्न भंगल्याचे दिसते. गिरीराज सिंह यांनी तब्बल ३ लाखांहून अधिक मते मिळवली असून कन्हैयाकुमार यांना दोन लाखांपेक्षा कमी मते मिळाली आहेत.