01 October 2020

News Flash

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळयाचे BIMSTEC देशांना निमंत्रण

सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमत मिळवणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा येत्या ३० मे रोजी शपथविधी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी येत्या ३० मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळयांसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रण देणार का? अशी चर्चा सुरु असताना भारताकडून बीआयएमएसटीइसी देशांच्या नेत्यांना शपथविधी सोहळयाचे निमंत्रण देण्यात आल्याचे एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. BIMSTEC ही सात देशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. भारतासह बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान हे देश या संघटनेचे सदस्य आहेत. पाकिस्तान BIMSTEC संघटनेचा सदस्य नाही.

नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली पहिल्यांदा सत्ता मिळवली तेव्हा त्यांनी सार्क देशांच्या प्रमुखांना शपथविधी सोहळयाचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफही भारतात आले होते. शपथविधीच्या दुसऱ्यादिवशी भारत-पाकिस्तानसंबंधांबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली होती.

रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून दोन्ही देशांच्या उन्नतीसाठी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर, या क्षेत्रात शांतता व समृद्धी वाढवण्यासाठी हिंसाचार व दहशतवाद यापासून मुक्त असलेले वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे मोदी यांनी त्यांना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या भरघोस विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी खान यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विटरचा आधार घेतला होता. यानंतर रविवारी त्यांनी मोदी यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. या संवादात, दक्षिण आशियात शांतता, प्रगती आणि समृद्धी ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मोदी यांच्यासोबत काम करण्याची आपण वाट पाहात असल्याचे खान म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 7:07 pm

Web Title: bimstec leaders to attend pm narendra modis oath taking ceremony
Next Stories
1 जनादेश मान्य, मात्र आत्मपरीक्षण करणार-सुप्रिया सुळे
2 स्मृती इराणींचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी तीन संशयित अटकेत
3 त्यांच्यालेखी आम्ही माणसं नाही – ओवेसींची संतप्त प्रतिक्रिया
Just Now!
X