लोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबईतून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या पदरी निराशा पडली आहे. भाजपाने विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिली आहे. एकीकडे निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात झाली असतानाही सोमय्या यांच्या उमेदवारी अर्जाची घोषणा आली नव्हती. तर दुसरीकडे मनोज कोटक यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आलं होतं. यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण अखेर आज मनोज कोटक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

किरीट सोमय्या यांना उमेदवारी न मिळण्यामागे शिवसेनेची नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक वक्तव्य केली होती. यामुळेच शिवसेना किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध करत होती. किरीट सोमय्या यांनी वारंवार प्रयत्न करुनही शिवसेनेचा विरोध मावळत नव्हता. किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचाही प्रयत्न केला होता. पण भेट नाकारण्यात आल्याने त्यांची निराशा झाली होती.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात किरीट सोमय्या यांना भाजपची उमेदवारी मिळण्यावरून शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांच्यासह काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाहीर टीका करत सोमय्या यांना आव्हान देण्याची भाषा केली होती. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तर राऊत यांच्या विधानावर भाष्य करण्याची गरज नाही, असे सांगत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी या वादाला फारसे महत्त्व देत नसल्याचे संकेत दिले होते.

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर किरीट सोमय्या हे नार्वेकर यांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. त्यावेळी निरोप घेताना उद्धव ठाकरे यांच्या भेटीची इच्छा सोमय्या यांनी व्यक्त केली होती. त्याचबरोबर संजय राऊत यांच्या भेटीचा प्रयत्न झाला पण ती भेट होऊ शकली नव्हती. मात्र, उद्धव यांना भेटण्यासाठी औपचारिकपणे सोमय्या यांनी मातोश्रीवर विचारणा केली नव्हती, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेचा रडीचा डाव, किरीट सोमय्या अभ्यासू खासदार: नारायण राणे</strong>
किरीट सोमय्या हे अभ्यासू खासदार आहेत. ते चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. त्यांची कामगिरीही चांगली आहे. शिवसेना त्यांना विरोध करून रडीचा डाव खेळत असल्याची टीका, खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली होती.