बॉलिवूड अभिनेता सनी देओलने नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर त्याला लगेचच पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघामधून निवडणुकीचे तिकीटही देण्यात आले. सोमावारी त्यांनी नामांकन अर्ज दाखल केला. मात्र हा नमांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी सनीला त्याच्या चाहत्यांनी चक्क हॅण्ड पंप भेट दिला. २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या सिनेमातील एका दृष्यानंतर सनी देओल आणि हॅण्ड पंप हे जणून समीकरणच झाले आहे.

नामांकन अर्ज भरल्यानंतर सनी यांनी साडेचार मिनिटांचे छोटे भाषण केले. आपल्या पहिल्याच राजकीय भाषणामध्ये त्यांनी गदर सिनेमातील भूमिकेची आठवण होईल अशी डायलॉगबाजी केली. ‘ये ढाई किलो का हाथ जिस पर पडता है वो उठता नहीं उठ जाता है. मला ही ताकद तुमचे प्रेम आणि विश्वासामुळे मिळाली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. ‘प्रत्येक पंजाबी व्यक्तीच्या हृदयात तू स्थान मिळवलं आहेस, असं मला माझे बाबा म्हणतात. तुम्ही माझ्यावर जितकं प्रेम करता त्याहून अधिक प्रेम मी तुमच्यावर करतो. राजकारणाबद्दल मला फार काही माहीत नाही. पण मी देशभक्त आहे,’ असं ते पुढे म्हणाले. पंजाबी भाषेत त्यांनी जनतेशी संवाद साधला.

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटामध्ये सनी देओल मुख्य भूमिकेत झळकले होते. या सिनेमामधील सनी देओल यांनी पाकिस्तानमधील हॅण्ड पंप उखडतानाचे दृष्य आहे. हे दृष्य सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चांगलेच चर्चेत होते. सनी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतरही अनेकांना या दृष्याची आठवण झाली होती. यावरुन अनेक मिम्सही ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट करण्यात आले होते. मात्र या चित्रपटानंतर सनी यांनी फार थोड्या चित्रपटांमध्ये काम केलं आणि कलाविश्वामधील त्यांचा वावर कमी झाला. आता त्यांनी भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला असून पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुदासपूरला आलेल्या सनी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग, जितेंद्र सिंग, विजय संपला यांच्याबरोबरच सनी यांचा छोटा भाऊ आणि अभिनेता बॉबी देओलही उपस्थित होता.