पुण्यात विजयाबाबत भाजप-काँग्रेसकडून दावे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्यापैकी पुण्याचा कारभारी म्हणून काम करण्याची संधी कोणाला मिळणार हे गुरुवारी (२३ मे) स्पष्ट होणार आहे. पुण्याच्या निकालाएवढीच विजयी उमेदवाराला मिळणाऱ्या मताधिक्याबाबत  उत्सुकता असून गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य गिरीश बापट यांना मिळेल, असा दावा भाजपचे पदाधिकारी करत आहेत. तर, भाजपच्या कारभाराला कंटाळलेले पुणेकर काँग्रेसच्या मोहन जोशी यांना कौल देतील, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाले. निवडणुकीसाठी काही उमेदवार रिंगणात असले तरी भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष युतीचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यातच खरी लढत होणार आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोण विजयी होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच गिरीश बापट यांच्या नावाची घोषणा भाजपकडून करण्यात आली. त्या तुलनेत काँग्रेसकडून शेवटच्या क्षणी जोशी यांचे नाव जाहीर करण्यात आले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने जोरदार प्रचार केला. पुणे लोकसभेसाठी ४९.८४ टक्के मतदान झाले. या सर्व गोष्टींचा दाखला देत दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा करण्यात आला आहे.

पुणे लोकसभा मतदार संघावर बहुतांश वेळा काँग्रेसचे वर्चस्व राहिले असले तरी गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अनिल शिरोळे हे तब्बल ३ लाख १५ हजार मतांच्या फरकांनी विजयी झाले होते. यंदा भाजपकडून बापट यांना संधी देण्यात आली. पुणे लोकसभा मतदार संघात येत असलेल्या सहाही मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. पक्षाचे नगरसेवकही मोठय़ा संख्येने आहेत. त्यामुळे बापट हे मोठय़ा मताधिक्यांनी विजयी होतील, असा विश्वास भाजपचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. कसबा, पर्वती, शिवाजीनगर आणि कोथरूड विधानसभा मतदार संघातून बापट यांना मोठे मताधिक्य मिळेल, असा दावाही करण्यात आला आहे. भाजपची साडेचार वर्षांतील कामगिरी, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यात आलेले यश, संघटनात्मक ताकदीबरोबरच शहरी भागात राबविण्यात आलेल्या योजनांमुळे मतदार भाजपच्या पाठीशी राहतील, असेही सांगण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला पुणेकर कंटाळले आहेत. त्यामुळे काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांना पुणेकर मतदार कौल देतील. शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगावशेरी विधानसभा मतदार संघातून काँग्रेसला मोठे मतदान होईल. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेल्या आघाडीचाही आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकदिलाने निवडणुकीत केलेल्या प्रचाराचा फायदा मोहन जोशी यांना होईल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बारामतीत धक्कादायक निकाल लागणार का?

बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कांचन कुल यांच्यातील लढत हा राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बारामतीमध्ये जिंकण्याचा निर्धार पुण्यातील मेळाव्यात व्यक्त केला होता. पक्षाचे अनेक नेते कांचन कुल यांच्या प्रचारासाठी निवडणुकीत उतरले होते. त्यामुळे कुल यांच्याकडून सुप्रिया सुळे यांना कडवी लढत दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे हा मतदार संघ राखणार का, याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मोठे मताधिक्य घेऊन सुप्रिया सुळे विजयी होणार की सुळे यांचा पराभव करून कांचन कुल जायंट किलर ठरणार, हे गुरुवारी स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp congress claims about victory in pune
First published on: 23-05-2019 at 00:25 IST