26 September 2020

News Flash

भाजपा रमेश किणी प्रकरण काढणार? राज ठाकरेंविरोधात व्यूहरचना

राज ठाकरेंचे हे हल्ले परतवून लावण्यासाठी भाजपाने सुद्धा व्यूहरचना आखली आहे. रमेश किणी प्रकरणावरुन राज ठाकरेंना अडचणीत आणण्याची भाजपाची रणनिती आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जोरदार भाषणांनी सत्ताधारी भाजपाला घायाळ करुन सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जुनी भाषणे आणि वास्तवातली परिस्थिती यामधली तफावत दाखवून देत भाजपाची चांगलीच कोंडी केली आहे. राज ठाकरेंचे हे हल्ले परतवून लावण्यासाठी भाजपाने सुद्धा व्यूहरचना आखली आहे. रमेश किणी प्रकरण, दादरच्या कोहिनूर मिलची खरेदी या मुद्यांवरुन राज ठाकरेंना अडचणीत आणण्याची भाजपाची रणनिती आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

रमेश किणी हत्या प्रकरणात राज ठाकरे आरोपी होते. नंतर त्यांची सुटका झाली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या मुलासोबत भीगादारीमध्ये त्यांनी दादरची कोहिनूर मिल खरेदी केली होती. पुढे राज ठाकरेंनी त्यांचा हिस्सा विकून टाकला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राज ठाकरेंनी केलेले आरोप खोडून काढण्यासाठी राज ठाकरेंच्या भाषणाचे जुने व्हिडिओ दाखवण्याची भाजपाची योजना आहे. उद्या शनिवारी मुंबईतील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आधीच २७ एप्रिलला राज ठाकरेंना त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर देण्यात येईल असे जाहीर केले आहे.

राज ठाकरेंना जिथे जास्त लागेल तिथेच वार करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. राज ठाकरेंविरोधातील प्रेझेंटेशनमध्ये रमेश किणी सुद्धा एक मुद्दा असेल. प्रेझेंटेशनमध्ये कुठल्या मुद्दयांचा समावेश करायचा त्यावर पक्षामध्ये विचारविनिमय सुरु आहे असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. राज ठाकरे दररोज आपल्या भाषणांमध्ये प्रेझेंटेशन मांडून भाजपाच्या खोटया जाहीराती, फसव्या आश्वासनांची पोलखोल करत आहेत. त्यामुळे निवडणूक न लढवतानाही मनसेने भाजपाची मोठी कोंडी केली आहे. म्हणूनच आता भाजपाने उत्तर देण्याची रणनिती आखली आहे.

काय आहे रमेश किणी प्रकरण
रमेश किणी हे दादरला रहाणारे रहिवाशी होते. १९९६ साली त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. रमेश किणी बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी पुण्यातील चित्रपटगृहात त्यांचा मृतदेह सापडला. बेपत्ता होण्याआधी रमेश किणी यांनी दादरच्या लक्ष्मी निवास इमारतीमधील त्यांचा फ्लॅट रिकामी करण्यास नकार दिला होता. रमेश किणी यांची पत्नी शीला यांनी इमारतीचा मालक फ्लॅट रिकामी करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता. लक्ष्मी निवास इमारतीचा मालक राज ठाकरेंचा जवळचा मित्र होता. राज ठाकरे या प्रकरणात आरोपी होते. नंतर त्यांची सुटका झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 2:51 pm

Web Title: bjp could raise ramesh kini murder case against mns chief raj thackeray
Next Stories
1 मोदींच्या दौऱ्यापूर्वी १ लाख ४० हजार लिटर पाण्याने धुतले वाराणसीतील रस्ते
2 श्रीरंग बारणे की पार्थ पवार, मावळमधील तरुणांचे मत काय ?
3 मोदीच बहुमतानं जिंकावेत; मुस्लीम महिलांची माहिमच्या दर्ग्यात प्रार्थना
Just Now!
X