संभाषण व्हायरल झाल्याने युतीतील विसंवाद उघड 

अमरावती : भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आणि काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यातील कथित संभाषण ‘व्हायरल’ झाल्यानंतर आता सूर्यवंशी यांची दुसरी एक ‘ऑडिओ क्लीप’ समाजमाध्यमांवर फिरू लागल्याने युतीच्या पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद उघड झाला आहे. शिवसेना प्रचार निरीक्षकासोबत संभाषण झाल्याची कबुली दिनेश सूर्यवंशी यांनी दिली, पण यातून आपण शिवसेनेला  निवडून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना पुष्टीच मिळते, असा दावा त्यांनी केला आहे.

शिवसेना उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी मुंबईहून आलेल्या निरीक्षकांपैकी एक नितीन जवांदे आणि दिनेश सूर्यवंशी यांच्यात मतदानाच्या एक दिवस आधी फोनवर झालेले संभाषण आता सार्वजनिक झाले आहे. सुरुवातीला सहजपणे सुरू झालेला संवाद अखेरीस चढय़ा आवाजात जातो. शिवसेना- भाजपने बुथ प्रमुखांच्या माध्यमातून प्रचाराला गती द्यायची. त्यांना प्रत्येकी अडीच हजार रुपये द्यायचे, अशी माहिती या ऑडिओ क्लीपमधून उघड होते. डोंगराळ भाग असल्यामुळे अडीच हजार रुपये अपुरे पडतात. सेना-भाजपचे पैसे एकत्र पोहचलेले नाहीत, असे सूर्यवंशींकडून सांगण्यात येते. दोन्हीकडून शंभर टक्के काम झालेले नाही. सक्सेस नाही. तुमच्या बाजूने शून्य काम झाले आहे. यासंदर्भात आपण भाजप कार्यालयात तक्रार करणार आहोत, असे उत्तर नितीन जवांदे देतात. आता डोक्यावरून  पाणी गेले आहे. सकाळी १० वाजता पैसे दिल्यानंतर झोप काढून तुमचा तालुकाध्यक्ष दुपारी साडेतीन वाजता घराबाहेर पडतो. तुम्ही त्याला लाडावून ठेवले आहे, असे जवांदे म्हणताच सूर्यवंशी चिडतात. तुमचे आम्ही नोकर नाही. मर्यादेत राहून बोला. लाड-बिड शब्द वापराल, तर येथून हाकलून लावणार, तुम्ही आमचे बॉस नाही, अशा शब्दांत सरूयवशी खडसावतात. त्यानंतर वाद वाढत जाऊन तुम्ही आताच्या आता धारणी सोडा, असे बजावल्यानंतर धारणी आताच सोडली, असे उत्तर ऐकायला मिळते आणि हे संभाषण थांबते.

प्रचारादरम्यान युतीच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या या संभाषणातून प्रचारातील विसंवादाचे दर्शन घडले खरे, पण यामुळे दिनेश सरूयवशी यांच्या विरोधकांच्या हाती आयतेच कोलित मिळाले आहे.

काँग्रेस माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यासोबत संभाषण झालेले नसताना, या प्रकरणात आधी गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता शिवसेनेच्या प्रचार निरीक्षकासोबत फोनवरून झालेले संभाषण व्हायरल केले जात आहे. पण, यातून  युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घेतलेली मेहनतच दिसून येते. आपण अडसूळ यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केले, पण आपले काँग्रेससोबत संबंध असल्याचे खोटे आरोप करण्यात आले होते. या ऑडिओ क्लीपने किमान ते खोडून काढण्यास मदत केली आहे. मुंबईहून आलेल्या शिवसेना निरीक्षकास अध्यक्ष खडे बोल सुनावतात, ही भाजपच्या कार्यकर्त्यांना सुखावणारी बाब आहे. आपण जवांदे यांच्याशी नियोजनाबाबत चर्चा करीत होतो. त्यांनी काही न रुचणारे शब्द वापरले, त्यावर आपण तिखट प्रतिक्रिया दिली.

– दिनेश सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, भाजप.