दिगंबर शिंदे, सांगली

सांगलीत होत असलेल्या तिरंगी लढतीमध्ये भाजपाला वर्चस्व राखण्यासाठी आणि वसंतदादा घराण्याच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागणार आहे. बहुजन वंचित आघाडीच्या निमित्ताने युतीसह आघाडीच्या नाकात दम आला आहे. प्रथमदर्शनी भाजपला सोपी वाटणारी ही निवडणूक आता चुरशीची झाली आहे.

जिल्ह्य़ाचे मूळ प्रश्न कायम आहेतच, पण ४० सेल्सिअस तापमानामध्ये राजकीय साठमारीत दुष्काळाची समस्या बेदखल झाली असून जत, कवठेमहांकाळ तालुक्यात  पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

सांगलीत खरी लढाई भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील, महाआघाडीतील स्वाभिमानीचे विशाल पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यातच होत आहे. गोपीचंद पडळकर हे काल-परवापर्यंत भाजपाचे प्रचारक म्हणून वावरत होते. धनगर आरक्षणासाठी त्यांनी लढा उभा करून भाजपाशी संघर्ष उभारला असल्याचे दाखविण्यात येत असले तरी मुळात त्यांचे भांडण भाजपापेक्षा खासदारांशी आहे. टीका टिप्पणी करीत असताना जातीचा आधारही काही प्रमाणात घेतला जात आहे.

समस्यांची चर्चाच नाही

सांगलीचे शांघाय, चकचकीत रस्ते, रोजगारासाठी औद्योगिकीकरणाला गती, हळद-बेदाण्याचे मार्केटिंग आणि प्रक्रिया उद्योग, विमानतळ आणि  सिंचन योजनांचे पाणी या मूलभूत प्रश्नांची चर्चा होतच नाही. आजच्या घडीला जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव आणि खानापूर तालुक्यातील ११३ गावे आणि ७६९ वाडीवस्तीवर राहणाऱ्यांना आपली तहान भागविण्यासाठी टँकरच्या पाण्याची वाट पाहवी लागते.