X

आम्ही प्लॅटफॉर्मची उंची वाढवली, पण राज ठाकरेंची राजकीय उंची कमी झाली: सोमय्या

२० वर्षांच्या मुलीला मंचावर आणून राज ठाकरेंनी राजकारण करु नये, असा सल्ला सोमय्या यांनी दिला.

मोदी सरकारच्या काळात आम्ही ४२५ प्लॅटफॉर्मची उंची वाढवली, पण राज ठाकरे यांची राजकीय उंची कमी झाली आहे. राज यांची उंची २००९ मध्ये जी होती, ती आता जमिनीच्या खाली गेली आहे, अशा शब्दात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. राज ठाकरे यांनी २० वर्षांच्या मुलीला मंचावर आणून राजकारण करु नये, असा सल्लाही सोमय्या यांनी दिला आहे.

मुंबईतील लोकल अपघातात जखमी झालेल्या मोनिका मोरेला राज ठाकरे यांनी एका सभेत मंचावर बोलावले होते. अपघातात मोनिका मोरेला हात गमवावे लागले होते. यानंतर किरीट सोमय्या यांनी मोनिका मोरेच्या उपचारासाठी पुढाकार घेतला होता. मोनिका मोरेला सरकारी नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. पण अद्याप हे आश्वासन पूर्ण केलेले नाही, अशी खंतही तिने मनसेच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानंतर व्यक्त केली होती. मोनिका मोरे ही स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडरही होती.

राज ठाकरे यांनी मोनिका मोरेवरुन भाजपावर टीका केली होती. यावर किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मोनिका मोरेला आम्ही मदत केली आणि राज ठाकरेंनी तिला काय मदत केली याबाबत मी काही बोलणार नाही. मोनिका मोरेमुळे अनेक अपघातग्रस्तांना हिंमत मिळाली आणि आम्ही तब्बल ११०० अपघातग्रस्तांना मदतही केली होती. २० वर्षांच्या मुलीला मंचावर आणून राज ठाकरेंनी राजकारण करु नये, असा सल्ला सोमय्या यांनी दिला.

राज ठाकरेंची उंची आता लोकंच मोजून दाखवत आहेत, राज यांची उंची २००९ मध्ये जी होती, ती आता जमिनीच्या खाली गेली आहे, अशा शब्दात त्यांनी राज यांच्या टीकेला उत्तर दिले. मात्र, मोनिका मोरेला सरकारी नोकरी का मिळाली नाही, या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले.

  • Tags: लोकसभा निवडणूक २०१९,