मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फेरफार केलेले छायाचित्र सोशल मीडियावर टाकल्याबद्दल पश्चिम बंगालमधील भाजपाच्या युवा मोर्चाच्या नेत्या प्रियंका शर्मा यांना अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता भाजपा नेत्या शाझिया इल्मी यांनी ममता बॅनर्जींवरील मीम ट्विटरवर रिट्विट केले आहे. यात ममता बॅनर्जींना हिटलरच्या वेषात दाखवण्यात आले असून हे ट्विट करणाऱ्या युजरला शाझिया इल्मी यांनी ‘तुला तुरुंगात जायचे आहे ?’, असा प्रश्न विचारत ममतादीदींवर निशाणा साधला आहे.

ममता बॅनर्जी यांचे फेरफार केलेले छायाचित्र सोशल मीडियावर टाकल्याबद्दल पश्चिम बंगाल पोलिसांनी भाजपा भाजपा युवा मोर्चाच्या नेत्या प्रियंका शर्मा यांना अटक केली होती. प्रियंका शर्माने अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्याऐवजी ममता बॅनर्जी यांचा चेहरा असलेले छायाचित्र फेसबुकवर टाकले होते. यावरुन सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारले होते. यावरुन भाजपाने ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.

आता भाजपा नेत्या शाझिया इल्मी यांनी ट्विटरवर ममता बॅनर्जींसंदर्भात एक मीम रिट्विट केले आहे. भाजपा कार्यकर्ता विकास पांडे याने हे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ममता बॅनर्जींना हिटलरच्या वेषात दाखवण्यात आले आहे. शाझिया इल्मी यांनी मीम रिट्विट करत ‘विकास तुला तुरुंगात जायचं आहे का ?’, असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान, प्रियंका शर्मा यांना करण्यात आलेली अटक ‘सकृतदर्शनी मनमानी’ असल्याचे सांगून, प्रियंका शर्मा यांची सुटका करण्यात उशीर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पश्चिम बंगाल सरकारची कानउघाडणी केली होती. प्रियंका यांना बुधवारी सकाळी ९.४० वाजता तुरुंगातून सोडण्यात आल्याचे पश्चिम बंगाल सरकारच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर नाराजी व्यक्त करताना, ‘आज सकाळी का? आम्ही तुमच्या उपस्थितीत आदेश पारित केला होता’, असे खंडपीठ म्हणाले. राज्याच्या वकिलांनी कारागृहाच्या नियम पुस्तिकेचा (जेल मॅन्युअल) संदर्भ दिला, तेव्हा जेल मॅन्युअल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापेक्षा मोठे नसल्याचे न्यायालयाने सांगितले. ‘हे चालू शकत नाही. मुळात ही अटकच सकृतदर्शनी जुलमीपणाची होती’, असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते.