उत्तर प्रदेशातील कानपूर येथे सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना भाजपा नेता आणि मतदान केंद्रावर तैनात एका पोलीस अधिकाऱ्यात शाब्दिक चकमक उडाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओत भाजपा नेता पोलीस अधिकाऱ्याला तू माझ्या हिटलिस्टमध्ये आहे, आज मतदान होऊ दे उद्या बघतो तुला अशी धमकी देत असल्याचं दिसत आहे. यावेळी कानपूरच्या महापौर प्रमिला पांडेय दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. भाजपा नेत्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?
कानपूरमध्ये सोमवारी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यावेळी मतदान केंद्रावर तैनात पोलीस अधिकारी जनार्दन दुबे आणि भाजपा नेता सुरेश अवस्थी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. भांडण थांबवण्यासाठी महापौर प्रमिला पांडे यांना मध्यस्थी करावी लागली. ग्वालटोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या सरकारी शाळेत मतदान सुरु होतं. आरोप आहे की, भाजपाच्या पोलिंग एजंटसोबत जनार्दन दुबे यांनी गैरवर्तवणूक केली.

सुरेश अवस्थी यांना यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर जनार्दन दुबे यांच्याशी त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी महापौरांनी परिस्थिती नियंत्रणात आणली पण सध्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलीस अधिकारी जनार्दन दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिव्हिल लाइन्स मतदान केंद्रावर एका पोलीस कर्मचाऱ्याला तैनात करण्यात आलं होतं. सुरेश अवस्थी यांचं समोरच घर असून ते काही लोकांनी मतदान केंद्रावर पाठवत होते. यामुळे मतदान यादीवर वाद झाला. वाद वाढू लागल्याने मी तिथे पोहोचलो असता सुरेश अवस्थी तीन ते चार लोकांसोबत आले आणि मला धमकावू लागले. तू माझ्या हिटलिस्टवर आहेस, मी तुला पाहून घेईन अशा शब्दांत त्यांनी मला धमकावलं असल्याचं त्यांनी सांगितलं.