महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपल्या सभेत भाजपवाल्यांच्या सोशल मिडियाच्या नावाने ओरड करीत ज्या फेसबुक पेज वरील कुटुंबाला आपल्या व्यासपीठावर आणले, त्या राज ठाकरे यांच्या दाव्याचा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पर्दाफाश केला. त्या फेसबुक पेजशी भाजपाचा, पीएमओ ऑफिस, मुख्यमंत्र्यांचा काहीही संबध नाही. त्या कुटुंबीयाचा फोटो हा चक्क पाकिस्तान डिफेन्स आणि न्यूयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर यापूर्वीच झळकला होता, त्यामुळे मनसेचा आणि पाकिस्तानाचा काय संबंध हे प्रथम जाहीर करावे असे आव्हान तावडे यांनी राज ठाकरे यांना दिले.

तसेच आतापर्यंत लाव रे व्हिडाओ असे बोलणा-या राज ठाकरे यांना २७ एप्रिलला त्यांच्या स्टाईलने थेट प्रत्युत्तर देण्यात येईल अशी घोषणाही विनोद तावडे यांनी यावेळी केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते, माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये, प्रवक्ते विश्वास पाठक उपस्थित होते.
मोदी फॉर न्यू इंडिया हे फेसबुक पेज आमच्याशी संबिधत नाही. कारण ते फेसबुक पेज नॉन व्हॅरीफाईड आहे, अधिकृत फेसबुक पेज व्हॅरीफाईड असतं व त्या पेजला ब्ल्यू टीकमार्क असतो असे स्पष्ट करतानाच तावडे यांनी सांगितले की, योगेश चिले आणि त्यांच्या कुटूं‍बियांचा जो फोटो दाखविण्यात आला. तो फोटो संगोता मित्रा मुस्ताफी यांनी घेतला होता. त्या फोटोच्या आधारे एक बातमी करण्यात आली, ही बातमी मीट द अपवॉर्डली मोबाईल मिडल क्लास इंडियन…या मथळ्याखाली न्यूयॉर्क टाईम्स व पाकिस्तान डिफेन्स या वेबसाईटवर प्रसिध्द झाली आहे.

त्या बातमीनुसार चिलेंनी मध्यम वर्ग बदलतोय आणि त्या परळच्या मध्यमवर्गीय कुटुंबाचा विकास कसा झाला अशा आशयाची ती बातमी आहे. ती न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापली होती. न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता असल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तान डिफेन्सच्या वेबसाईटवरही ही बातमी झळकवली आहे, कदाचित पाकिस्तान डिफेन्सचा यामध्ये संबंध नसेल पण पाकिस्तान आणि मनसेचं काय नातं आहे.

कारण इम्रान खान यांनी जे पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल जे म्हटले त्याचा उल्लेख काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस करीत नाहीत. पण राज ठाकरे मात्र वारंवार करतात. त्यामुळे मनसेचे पाकिस्तानी कनेक्शन काही आहे का, हे एकदा तपासलंच पाहिजे. हा फोटो ४-५ वर्षांपूर्वीचा आहे. कारण काल त्यांची कन्या ही स्टेजवर दिसली ती या फोटोपेक्षा मोठी झालेली आहे. असेही तावडे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. आता नरेंद्र मोदी यांच्या पाठीराख्यांची शेकडो, हजारो फेसबुक पेजस आहेत.

राज ठाकरे यांचेही दहा बारा फेसबुक पेजेस आहेत. आता या सगळया राज ठाकरे यांच्या आहेत असे नाही. तर कोणी राज ठाकरे, कोणी ठाकरे राज, कोणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कोणी राज साहेब ठाकरे अशा वेगवेगळी फेसबुक पेज आहेत व त्यावर वेगवेगळया गोष्टी पोस्ट असतात असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

शरद पवार सुध्दा आता जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी जाहिर सभेत नौटंकी करायला लागले आहेत असा टोला लगावत तावडे म्हणाले की, नाशिकच्या सभेत अर्धनग्न अवस्थेत स्टेजवर आलेला शेतकरी हा येवला येथील नगरसुल मधील राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक आहे. मात्र, आता पवार यांना जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी नौटंकी करावी लागण्याची वेळ यावी हे दुदैर्व आहे.

तसेच शेतकऱ्यासाठी या सरकारने जेवेढे काम पावणे पाच वर्षात केले तेवढे काम यापूर्वीच्या सरकारानेही केले नाही. त्यांच्या काळात २००८-२००९ पासूनच्या पुढच्या कालावधीमध्ये शेतक-यांना ४००० कोटीची थकबाकी त्यांनी माफ केली होती. आम्ही २४ हजार ३१७ कोटीची थकबाकी माफ केली. त्यांनी रक्कम बँकांना दिली. आम्ही ती रक्कम थेट शेतक-यंच्या खात्यात दिली. त्यांनी २० हजार रुपयांचे कर्ज माफ केले मात्र, आम्ही १,५०,००० रुपयां पर्यंतचे कर्ज माफ केले. त्यांच्या काळाक ३४ लाख खाती होती. तर आमच्या काळात ५० लाख खाती आहेत. त्यांच्या काळात लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्यांना कर्जमाफी दिली होती. आम्ही या सगळयांना वगळंल होतं त्यामुळे, शेतकरी हिताचा गळा जे ते काढताहेत, त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस सरकारने केल्या साडेचार ते पाच वर्षात शेतकऱ्यांसाठी त्यांच्या १५ वर्षांपेक्षा अधिक सकारात्मक काम केलेलं आहे, हे वास्तव या आकडेवारीवरुन आज स्पष्ट होत आहे.

महागठबंधनातील नेते आता ईव्हीएम मशीनचे कारण देत पराभवाची कारणे शोधत आहेत, असा टोला तावडेंनी विराधकांना लगावला आहे. रशिया ईव्हीएम मशीन हॅक करू शकतात असे चंद्राबाबू नायडू म्हणतात पण जेव्हा निवडणूक आयोगानी सर्व पक्षांना ईव्हिएम तपासणीसाठी बोलावले होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीएम सोडून एकही पक्ष उपस्थित राहिले नाही. ज्याप्रमाणे पैलवान पवारांनी माढ्यातून पळ काढला त्याप्रमाणेच आम्हाला फक्त ईव्हीएम पद्धत समजून घ्यायची आहे अशी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसने पळ काढला होता.

काल राज ठाकरे म्हणाले की, मुकेश अंबानी यांनी मिलींद देवरा यांना पाठींबा दिला याचा अर्थ की, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत. पण बहुधा त्यांचा अभ्यासच अर्धवट असतो. १९७७ ला धिरुभाई अंबानींनी इंदिरांजींना पाठींबा दिला होता, इंदिराजी जिंकल्या? २००४ ला मुकेश अंबानींनी अटलजींना पाठींबा दिला होता, अटलजी त्यावेळी जिंकले? आणि राज ठाकरे साहेब, या देशातली लोकशाही ही धनदांडग्या उद्योगपतींच्या मतावर ठरत नाही. तर शेतकरी,झोपडीत राहणारा कष्टकरी याच्या मतावर ठरते हे कृपया समजून घ्या. स्क्रीप्ट एकदा आली तर वाचून घ्या. चूकीच्या गोष्टी दुरुस्त करा. तुमची प्रतिमा त्यामध्ये खराब होतेय, याची काळजी घ्या, म्हणून त्यांना सांगावसं वाटतयं.