तक्रारीत तथ्य असल्याचा निवडणूक अधिकारी अवनी लवासा यांचा निर्वाळा

अरुण शर्मा, एक्स्प्रेस वृत्तसेवा, जम्मू

लडाखमधील निवडणुकीत पक्षाच्या बाजूने बातम्या देण्यासाठी पत्रकारांना जम्मू-काश्मीरच्या भाजप नेत्यांनी पाकिटातून पैसे वाटल्याच्या तक्रारीत सकृतदर्शनी तथ्य असल्याचे या प्रकरणी चौकशी करणाऱ्या सत्यशोधन समितीने म्हटले आहे.

लेहच्या जिल्हा निवडणूक अधिकारी व उपआयुक्त अवनी लवासा यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून त्यांनी सांगितले की, मंगळवारी आम्ही या प्रकरणी पोलिसांमार्फत न्यायालयात दाद मागितली असून प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशी विनंती केली आहे.

भाजप नेत्यांनी पत्रकारांना पैशाची पाकिटे वाटून आदर्श आचारसंहितेचा भंग केला असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून तो गुन्हा आहे असे लवासा यांनी सांगितले.

अवनी लवासा या जम्मू-काश्मीर केडरच्या २०१३ मधील तुकडीच्या अधिकारी आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याबाबतच्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारीत तथ्य असल्याचे मत व्यक्त करणारे निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या त्या कन्या आहेत.

लडाख येथे पाचव्या टप्प्यात सोमवारी मतदान झाले असून भाजप नेत्यांनी पत्रकारांना लाच दिल्याच्या प्रकरणात सकृतदर्शनी तथ्य आहे. आपण त्याबाबत पोलिसांना न्यायालयात प्राथमिक  माहिती अहवाल दाखल करण्यासाठी परवानगी मागण्यास सांगितले आहे, असे श्रीमती लवासा यांनी सांगितले.

यात तीन तक्रारी आहेत. त्यात एक आमची, दोन लेह प्रेस क्लबच्या आहेत. आता या तीन तक्रारी पोलिसांनी एकत्र केल्या आहेत. लेह प्रेस क्लबने लेहचे  जिल्हा निवडणूक अधिकारी व  पोलीस अधिकारी यांच्याकडे स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत. जम्मू काश्मीरचे भाजप अध्यक्ष रविंदर  रैना व आमदार विक्रम रंधावा यांनी भाजपच्या बाजूने बातम्या देण्यासाठी दोन मे रोजी पत्रकार परिषदेत पत्रकारांना पैशाची पाकिटे दिली.

रैना यांनी हा आरोप फेटाळताना सांगितले की, २ मे रोजी पत्रकार परिषदेत पत्रकारांना जी पाकिटे देण्यात आली त्यात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दोन दिवसांनी होणाऱ्या सभेच्या निमंत्रणपत्रिका होत्या. आम्ही प्रतिष्ठित लोकांना देण्यासाठी सभेच्या २००० पत्रिका छापून घेतल्या होत्या. त्या पत्रकारांनाही देण्यात आल्या. मी स्वत: कुणा पत्रकाराला पाकीट दिलेले नाही. त्यामुळे ज्या पत्रकारांनी तक्रारीत माझे नाव घेतले आहे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

समाजमाध्यमावर काही चित्रफिती फिरत असून त्यात भाजप नेते चार ते पाच पत्रकारांना पाकिटे वाटताना दिसत आहेत. त्यात दोन महिला पत्रकारही आहेत. महिला पत्रकाराने हे पाकीट फोडले असता त्यात पैसे आढळल्याने ती पळत भाजप नेत्याकडे ते परत करण्यासाठी गेली. जेव्हा भाजप नेत्याने ते पाकीट परत घेतले नाही तेव्हा तिने ते टेबलावरच टाकून दिले.

भाजपकडून चौकशी समिती

जम्मू: काही नेत्यांनी पत्रकारांना पाकिटे दिल्याच्या घटनेची चौकशी जम्मू व काश्मीर भाजप करणार आहे. त्यासाठी एका समितीची स्थापना केली जाणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी स्पष्ट केले.