पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना धक्का

पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणूक रक्तरंजित प्रचाराने गाजत असताना तेथे भाजप पाय रोवणार की नाही ही उत्सुकता होती, भाजपने अपेक्षेप्रमाणे तेथे चांगली कामगिरी केली असून ४२ पैकी १९ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर होते. या निवडणुकीत मतांचे मोठय़ा प्रमाणात ध्रुवीकरण झाले. भाजप विरोधी मते फुटल्याने त्याचा भाजपला  फायदा झाला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांचा आक्रस्ताळेपणा भोवला आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या माल्दा उत्तर व दक्षिण मतदारसंघात (काँग्रेसचे दिवंगत नेते एबीए घनीखान चौधरी यांचा मतदारसंघ) भाजपने आघाडी घेतली. राजकीय तज्ञांच्या मते माल्दा हा मुस्लीम बहुल जिल्हा असूनही मुस्लिमांची मते काँग्रेस व तृणमूल यांच्यात विभागली गेली. यावेळी माल्दा उत्तर मतदारसंघातून घनीखान यांची पुतणी तृणमूलकडून उमेदवार होती. भाजपने हिंदू मतांवर पकड घट्ट केल्याने त्यांना फोयदा मिळाला आहे. रायगुंज येथे काँग्रेस नेते प्रियरंजन दास मुन्शी यांचा एकेकाळी दबदबा होता, पण तेथे माकपचे महंमद सली यांनी २०१४ मध्ये विजय मिळवला. यावेळी तेथे भाजपचा उमेदवार सकाळी आघाडीवर होता. रायगुंज येथे मुस्लीम लोकांची संख्या ४९.८ टक्के आहे. डाव्यांना खातेही उघडता येईल की नाही अशी परिस्थिती होती. काँग्रेसला एका जागेवर आघाडी मिळाली होती. बोनगाव, राणाघाट या मातुआ समुदायाची बहुसंख्या असलेल्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. उत्तर बंगालमध्ये भाजप उमेदवारांनी दार्जिलिंग, बालुरघाट, अलिपूरदुआर येथून आघाडी घेतली तर कूचबिहार येथे भाजप व तृणमूल यांच्यात तुल्यबळ लढत झाली आहे. आदिवासी पट्टय़ातील झारग्राम, बिष्णूपूर, बांकुरा येथे भाजपने आघाडी घेतली असून भाजपचे सौमित्र खान यांनी प्रचारच केला नव्हता. भाजपला जो मोठा लाभ झाला आहे त्यात डाव्यांच्या मतांचा वाटा भाजपकडे आलेला दिसत आहे. डाव्यांना २०१४ मध्ये ३९ टक्के मते होती त्यांना यावेळी सुरुवातीला ७ टक्के मिळालेली दिसत होती.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ओस

पश्चिम बंगालमधील निकालाचे कल स्पष्ट होत असताना त्यात भाजपला अनेक ठिकाणी आघाडीचे वृत्त येताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे दक्षिण कोलकाता येथील कालीघाट भागातले निवासस्थान ओस पडले. बोटावर मोजण्याइतके तृणमूल कार्यकर्ते तेथे जमले होते. पक्षाच्या इएम बायपास येथील मुख्यालयातही नैराश्याचे वातावरण होते. बॅनर्जी यांच्या निवासस्थानाभोवती पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, असे निकाल अपेक्षित नव्हते. पक्ष प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ४२ जागाजिंकण्याची हाक दिली होती. बंगालमधील छुपा प्रवाह आम्हाला कळला नाही.

प. बंगाल (आघाडी)

  • एकूण जागा ४२
  • तृणमूल २३
  • भाजप १८
  • काँग्रेस १
  • डावे पक्ष ००