भाजपचे उत्तर मुंबईतील उमेदवार गोपाळ शेट्टी यांचे वादग्रस्त विधान

मुंबई : ऊर्मिला मातोंडकर या सिनेतारका असल्याने त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे, असे विधान उत्तर मुंबई मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केल्याने वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसने त्यांच्या वक्तव्याचा निषेध करून भाजपवर टीका केली आहे.

‘आम्ही ऊर्मिला मातोंडकर यांचा चेहरा बघू आणि गोपाळ शेट्टी यांचे काम बघू’ अशी चर्चा नागरिकांमध्ये असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. मात्र, आपण फक्त लोकांमध्ये काय चर्चा आहे तेच बोललो. कोणाला शब्द खटकत असले तर मी दुरुस्त करायला तयार आहे, असे गोपाळ शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

उत्तर मुंबईत भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेसला योग्य उमेदवार पक्षात मिळत नव्हता. त्यानंतर ऊर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आणि मातोंडकर यांनी भाजप-मोदी यांच्यावर राजकीय हल्ला चढवल्यानंतर या मतदारसंघातील एकतर्फी वाटणाऱ्या लढतीत रंगत आली आहे.

गोपाळ शेट्टी आता सावध झाले असून प्रचारासाठी ठिकठिकाणी फिरत आहेत. त्यातून एकमेकांवर टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. त्यातूनच आम्ही ऊर्मिला मातोंडकर यांचा चेहरा बघू, तर आपले काम, असे शेट्टी यांनी म्हटल्याने काँग्रेसने त्यांना लक्ष्य केले आहे.

त्याबाबत माध्यमांनी शेट्टी यांना विचारले असता, लोकांमध्ये जी चर्चा आहे ती आपण फक्त जाहीरपणे बोललो. मातोंडकर यांचे पालक राष्ट्र सेवादलाशी संबंधित आहेत.

ऊर्मिला यांच्या भाषणांमधूनच त्यांना राजकारणाची चांगली समज आहे, हे दिसून येते. मात्र राजकारण प्रवेशासाठीची वेळ आणि पक्षाची निवड याबाबतीत ऊर्मिला यांची चूक झाली आहे. काँग्रेस पक्षात ऊर्मिला यांच्या चांगल्या गुणांवर बोळा फिरवला जाईल, असे गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.

काँग्रेसची टीका

गोपाळ शेट्टी यांना महिलांबद्दल किती आदर आहे, हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील यांनी व्यक्त केली आहे. ख्रिस्ती धर्मीयांच्या विरोधातही शेट्टी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मातोंडकर यांच्या कुटुंबीयांची पाश्र्वभूमी शेट्टी यांना बहुधा माहीत नसावी. चांगले काम करण्याच्या उद्देशानेच त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे, पण भाजपची महिलांच्या विरोधातील भूमिका शेट्टी यांच्या वक्तव्यातून व्यक्त झाली आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.