पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये हिंचारा सुरु आहे. भाजपाने तृणमूल काँग्रेसचे समर्थक भाजपा समर्थकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर हल्ले करत असल्याचा दावा केलाय. आमच्या ९ कार्यकर्त्यांचा या हिंचारात मृत्यू झाल्याचं भाजपाने म्हटलं आहे. भाजपाबरोबरच डाव्या पक्षांनाही तृणमूल काँग्रेसवर हिंसाचाराचा आरोप केलाय. दरम्यान पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार असणाऱ्या परवेश साहिब सिंह यांनी पश्चिम बंगालमधील हिंसेच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिलीय. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनाही दिल्लीत यावं लागतं हे लक्षात ठेवा, असा धमकी वजा इशारा सिंह यांनी ट्विटरवरुन दिलाय.

पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या तृणमूल काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळालं. दोन मे रोजी निकाल समोर आल्यानंतर कोलकातामधील भाजपाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली. सोमवारीही राज्यातील काही भागांमध्ये भाजपाच्या कार्यकार्त्यांना मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहे. “निवडणूक जिंकल्यानंतर तृणमूलच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांचे जीव घेतले. भाजपा कार्यकर्त्यांच्या गाड्यांची त्यांनी तोडफोड केली. लक्षात ठेवा तृणमूलच्या खासदारांना, मुख्यमंत्र्यांना आणि आमदारांना दिल्लीतही यावं लागतं. याला इशारा समजा. निवडणुकीमध्ये पराभव आणि विजय होत असतात, हत्या होत नाहीत,” असं सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज्याच्या काही भागात हिंसाचाराचा उद्रेक झाल्याचे वृत्त आल्याच्या पाश्र्वभूमीवर ममतांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे  आणि चिथावणीला बळी न पडण्याचे आवाहन केले. निवडणुकीदरम्यान केंद्रीय दलांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार केल्याचा आरोप या वेळी ममतांनी केला. निवडणूक आयोगाने भाजपला मदत केली नसती तर त्या पक्षाला ५० जागांचा टप्पा ओलांडणेही कठीण झाले असते, असा आरोपही त्यांनी केला.