वर्धा : भाजपचे उमेदवार व विद्यमान खासदार रामदास तडस यांनी निवडणुकीसाठी २५ कोटी रुपये खर्च करणार असल्याची कबुली दिल्याचा दावा करणारे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसारित केले.

याप्रकरणी जिल्हा निवडणूक अधिकारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासदार तडस यांना नोटीस बजावली असून या संदर्भात खुलासा मागितला आहे. याशिवाय याबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले आहे.

२०१४ च्या निवडणुकीत मी १० कोटी रुपये खर्च केले होते. यावेळी २५ कोटी रुपये खर्च करेन, असे तडस यांनी म्हटल्याचा दावा या वाहिनीने केला आहे. तसेच तडस यांनी डमी उमेदवार उभे करण्यासाठी चार कोटी रुपये खर्च केले. यावेळी निवडणुकीसाठी पाच कोटी रुपये मिळाले. संपूर्ण निवडणुका ‘कॅश’नेच लढवल्या जातात. नोटाबंदीचा काळय़ा पैशांवर काहीच फरक पडत नाही, असेही त्यांनी म्हटल्याचा दावा या वाहिनीने केला आहे.

‘वाहिनीविरुद्ध तक्रार करणार’

नोटीस मिळाल्याची माहिती आहे, परंतु हा निव्वळ खोटेपणा आहे. असा खोटेपणा करणाऱ्या वाहिनीविरुद्ध तक्रार करणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार रामदास तडस यांनी दिली.