मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यात मतदान होणाऱ्या मुंबईतील मतदार संघात प्रचारादरम्यान हिंसक कारवाया सुरू झाल्या आहेत.  उत्तर मुंबई मतदार संघातील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार यात्रेदरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा ताजा असतानाच मंगळवारी ईशान्य मुंबईतही भाजपा उमेदवाराच्या प्रचार रथाची मोडतोड करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी भाजपाने केली आहे.

उत्तर मुंबई मतदार संघातील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार फेरीत घुसून भाजपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याची घटना काल घडली होती. तर आज अज्ञात व्यक्तींनी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या निवडणूक प्रचार रथाची नासधूस केल्याची घटना गोवंडी-शिवाजी नगरात घडली. गोवंडी भागातून हा प्रचाररथ फिरत असताना काही अज्ञात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रचाररथ अडवून धारधार शस्त्रांनी मोदी यांच्या फोटोची चिरफाड केली. तसेच गाडीच्या चालकाला धमकावून जोर जबरसत्तीने प्रचाररथ घेऊन पिटाळून लावण्यात आले.या प्रकरणी भाजपने शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.