विजयसिंह मोहिते-पाटील यांची प्रथमच उघड प्रतिक्रिया

माढा लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणारे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा औपचारिक राजीनामा अद्यापि दिला नाही आणि त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला नसला, तरी मंगळवारी माढय़ात मतदान सुरू झाल्यानंतर ते प्रथमच उघडपणे बोलले. केवळ माढाच नव्हे तर मावळ आणि बारामती या तिन्ही ठिकाणी  राष्ट्रवादीचा पराभव होऊन भाजपचे उमेदवार विजयी होतील, असे भाकीत मोहिते-पाटील यांनी स्पष्ट शब्दात वर्तविले आहे.

माढा लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादीअंतर्गत राजकारण पेटून त्यात अखेर मोहिते-पाटील गटाने पक्षाबरोबर काडीमोड घेऊन भाजपशी घरोबा केल्यानंतर येथील राजकारण ढवळून निघाले होते. त्यातून अपेक्षेनुसार अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मोहिते-पाटील यांच्यातील संघर्षांला तोंड फुटले. मोहिते-पाटील यांनी गांभीर्यपूर्वक राजकारण करीत दोन्ही काँग्रेसला भगदाड पाडून भाजपची ताकद वाढविल्यानंतर अखेर शरद पवार यांनी त्यांच्यावर विखारी शब्दात टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपशी साधलेली जवळीक पवार यांना अजिबात रुचली नाही. विजयसिंहांनी उतार वयात भाजपमध्ये जरूर जावे. परंतु अर्धी चड्डी आणि काळी टोपी घालू नये, अशी  पवार यांनी टीका केली. त्यावर मोहिते-पाटील यांनी उत्तर देण्याचे टाळले होते.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी माढा मतदारसंघात मतदान सुरू झाल्यानंतर मोहिते-पाटील यांनी पवार यांच्यावर थेट टीका न करता माढय़ात राष्ट्रवादीचा पराभव होऊन भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे शंभर टक्के निवडून येणार आहेत. केवळ माढय़ातच नव्हे तर शेजारच्या बारामती आणि मावळ येथे देखील राष्ट्रवादीला पराभवाचा फटका बसणार आहे, असे भाकीत वर्तविले. केवळ माढय़ातील उमेदवारीसाठी नव्हे तर कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपला मदत केल्याचा दावाही त्यांनी केला. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. परंतु राष्ट्रवादीतूनच या महत्त्वाकांक्षी योजनेला खो घातला जात होता. दुसरीकडे भाजप सरकारने या प्रकल्पासाठी नेहमीच सकारात्मकता दाखविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रकल्प पूर्ण करतील, असा विश्वास असल्यामुळेच आपण भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला. आपल्यावर कोणी कितीही टीका केली, तरी त्याची दखल आपणांस घ्यावीशी वाटत नाही, असेही मोहिते-पाटील यांनी विशद केले.