20 September 2020

News Flash

भाजप जिंकावा ही काँग्रेसची इच्छा

महाआघाडीचे समीर भुजबळ स्पर्धेत कुठेच नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांची टीका

भारतीय जनता पक्ष जिंकावा ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची प्रबळ इच्छा आहे. यामुळे भाजपने उभ्या केलेल्या उमेदवारांपुढे त्यांनी तुल्यबळ उमेदवार दिलेले नाहीत. नाशिकमध्ये महायुतीचे हेमंत गोडसे आणि वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्यातच सरळ लढत होईल. महाआघाडीचे समीर भुजबळ स्पर्धेत कुठेच नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्या प्रचारार्थ येथील वडाळा भागात आयोजित जाहीर सभेत शुक्रवारी आंबेडकर यांचे भाषण झाले. भारतीय जनता पक्ष जिंकावा यासाठी काँग्रेसने पूर्ण तयारी केली आहे. आतापर्यंत वाराणसीमधून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध निवडणूक लढविणार होत्या. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत दुसराच उमेदवार दिला.

नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसे उभे असताना समीर भुजबळसारखा कमजोर उमेदवार दिला आहे. लढत ही तुल्यबळ स्पर्धकांमध्ये होते. त्यामुळे पवार आणि गोडसे यांच्यात सरळ लढत होईल, असा दावा त्यांनी केला. आतापर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पाच वेळा पराभव झाला आहे. याचा अर्थ त्यांना युतीच्या उमेदवाराला हरविता आलेले नाही.

यंदाही कमजोर उमेदवार देत पक्ष विषाची परीक्षा घेत आहे. मुसलमान बांधवांनी निवडणुकीकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. आजही मुसलमानांची मते ही काँग्रेससोबत असली तरी आजची युवा पिढी ही वंचित बहुजन आघाडीसोबत आहे. पवार दुधासारखे असून मुसलमान बांधवांची मतरूपी साखर मिसळली तर गोडवा अधिक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी पवार यांनी आभार मानले.

दरम्यान, आंबेडकर यांची सभा पूर्वनियोजित वेळेपेक्षा दोन ते अडीच तास उशिराने सुरू झाली. सभेसाठी उत्सुक असलेले नागरिक भर उन्हात आंबेडकरांची प्रतीक्षा करत थांबले होते. प्रत्यक्ष सभा सुरू झाल्यावर आंबेडकर यांनी आटोपते घेतल्याने अनेकांचा हिरमोड झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 12:49 am

Web Title: bjp wins congresss wish
Next Stories
1 युती सरकारकडून जाती-पातीचे राजकारण
2 सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे मतदान प्रक्रियेत घोळ
3 मी उमेदवार : ठाणे
Just Now!
X