15 November 2019

News Flash

मतदानाच्या एक दिवस आधीच मतदारांच्या बोटांवर शाई, भाजपावर गंभीर आरोप

'त्यांनी आमच्या बोटावर बळजबरी शाई लावली आणि आम्ही आम्ही मतदान करु नये यासाठी 500 रुपयेही दिले'

(छायाचित्र सौजन्य - एएनआय)

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी आज(दि.१९) सकाळपासून सुरूवात झाली आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या चंदौली लोकसभा क्षेत्रातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. येथे मतदानाच्या एक दिवस आगोदरच मतदारांच्या बोटावर शाई लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, चंदौली लोकसभा क्षेत्रातील तारा-जीवापूर गावात दलित वस्तीतील नागरिकांनी भाजपा कार्यकर्त्यांवर मतदान करु नये यासाठी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. ‘शनिवारी सातव्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी तीन जण गावात आले. त्यांनी आमच्या बोटावर बळजबरी शाई लावली आणि आम्ही आम्ही मतदान करु नये यासाठी त्यांनी 500 रुपयेही दिले. ते तिघंही भाजपाचे कार्यकर्ते होते’ असं गावकऱ्यांनी सांगितलं.

वृत्तसंस्था एएनआयला एका गावकऱ्याने सांगितल्यानुसार, ‘ते लोक भाजपाचे होते आणि त्यांनी आम्ही पक्षाला मतदान करणार की नाही अशी विचारणा केली. त्यानंतर बोटाला बळजबरी शाई लावून झाल्यावर आता तुम्ही मतदान करु शकणार नाहीत, याबाबत कोणाला काहीही सांगू नका असं ते म्हणाले’.


या सर्व प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. ‘तक्रारकर्ते सध्या पोलीस स्थानकात आहेत, तक्रार दाखल झाल्यानंतर त्यानुसार कारवाई केली जाईल. ते लोक अजूनही मतदान करु शकतात, कारण घटना झाली त्यावेळी मतदानाला सुरूवात झाली नव्हती. पण त्यासाठी, बोटावर बळजबरीने शाई लावली असा उल्लेख एफआयआरमध्ये असणं आवश्यक आहे’, अशी माहिती चंदौलीचे पोलीस अधिकारी के.आर. हर्ष यांनी दिली. दरम्यान, मतदानाच्या एक दिवस आधीच घडलेल्या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली जात आहे.

First Published on May 19, 2019 1:36 pm

Web Title: bjp workers inked fingers to stop from voting voters in the up village allege