बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहे. सनी देओल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सध्या सनी देओल प्रचारसभा आणि प्रचाररॅली यांच्यामध्ये व्यस्त आहे. आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या अनेक सभांमध्ये त्यांचा भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. मात्र गेल्या काही दिवसांपासून या सभांमधून बॉबी देओल दिसेनासा झाला आहे. या मागचं कारणं खुद्द बॉबीने एका मुलाखतीमध्ये दिले आहे.

“माझा भाऊ माझ्यासाठी सर्वस्व आहे, त्याच्यासाठीदेखील मी तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे आम्ही कायम एकमेकांची साथ देतो. म्हणूनच सनी देओलच्या सुरुवातीच्या काही प्रचारसभांमध्ये मी हजेरी लावली होती. मात्र, सध्या मी माझ्या कामकाजामध्ये व्यस्त आहे. काही व्यक्तींना मी कमिटमेंट दिलेली आहे आणि ती मी मोडू शकत नाही, त्यामुळेच मला सनी देओलच्या प्रचारसभांमध्ये उपस्थित राहता येत नाहीये”, असं बॉबीने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “सध्या मी या प्रचारसभांमध्ये जरी हजर राहू शकत नसलो, तरीदेखील त्याच्यासोबत रहावं, त्याचं प्रोत्साहन वाढवावं असं मनापासून वाटतं. माझा कायम सनीला पाठिंबा असेल आणि मला शक्य होईल तितकी मदत मी करेन”. दरम्यान, सध्या सनी देओल त्यांच्या प्रचारसभांमध्ये प्रचंड व्यस्त आहेत. विशेष म्हणजे अभिनेता धर्मेंद्र यांनीदेखील या प्रचारसभांमध्ये उपस्थित राहून सनी देओल यांचं प्रोत्साहन वाढविलं होतं.