माजी खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी नरेंद्र मोदी सरकारला बॉलिवूडकडून मिळणारं समर्थन हे भीतीपोटी असल्याचं म्हटलं आहे. प्रिया दत्त यांना मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रिया दत्त दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी पुन्हा एकदा प्रिया दत्त यांची पूनम महाजन यांच्याशी लढत असणार आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

यावेळी त्यांना सध्या बॉलिवूड अभिनेते राजकीय भाष्य करत असून केंद्र सरकारची बाजू मांडत असल्याबद्दल विचारण्यात आलं. यावर हे भीतीपोटी होत असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘तुम्हाला वाटत नाही का यामागे भीती हे कारण आहे ? मला तरी असंच वाटतं. नाहीतर अचानक इतका बदल कसा झाला असता?’, असा प्रश्न प्रिया दत्त यांनी विचारला आहे.

‘प्रत्येकाचं नुकसान झालं आहे. प्रत्येक नागरिकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. समाजावर ते प्रभाव पाडतात. पण त्यांच्यावरही जबाबदारी असते. त्यामुळे त्यांनी स्पष्ट मत मांडलं पाहिजे’, असं प्रिया दत्त यांनी म्हटलं आहे. यावेळी प्रिया दत्त यांनी राजकारणातून ब्रेक घेण्यासंबंधी आणि पुन्हा निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यासंबंधीही सांगितलं.

‘मी दोन ते तीन वर्ष राजकारणात सक्रीय होते. पण मला माझ्या वैयक्तिक कामांवरही लक्ष द्यायचं होतं. मी नर्गिस दत्त फाऊंडेशनसाठी काम करत होते. ती नेहमीच माझी आवड राहिली आहे. मी राजकीयदृष्या सक्रीय नव्हते. मला माझ्या मुलांना सर्व वेळ द्यायचा होता जो मी गेल्या दहा वर्षात देऊ शकले नव्हते’, असं प्रिया दत्त यांनी सांगितलं आहे.

अंतर्गत राजकारणामुळे आपण निर्णय घेतला ही चर्चा चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘लोक खूप अंदाज लावतात. माझं कारण वैयक्तिक होतं. मी प्रत्येकाला त्याप्रमाणे कळवलं होतं. आमच्यात अनेक वैचारिक मतभेद होते हे मान्य आहे, पण आम्ही त्यावर चर्चा करुन तोडगा काढला आहे’, अशी माहिती प्रिया दत्त यांनी दिली.