नामदेव कुंभार, सोलापूर

उस्मानाबाद जिल्ह्यातील कौडगाव…या गावात किमान शंभर मुल लग्नाच्या वयाची.. पण गावात भीषण दुष्काळ आणि त्यात रोजगाराच्या संधीही नाहीत. ग्रामस्थांच्या ज्या जमिनी होत्या, त्या देखील एमआयडीसीसाठी गेल्या.. अशा संकटात सापडलेल्या या गावातील तरुणांची लग्न ठरत नाही. त्यामुळे या गावातील तीन तरुणांनी अखेर कर्नाटकमधील मुलींशी लग्न केले.

उस्मानाबाद जिल्ह्यात राहणारे उद्यकुमार थोरात हे गावातील तरुणांची लग्न ठरत नाहीत, असे सांगतात. मुलाला पाहण्यासाठी मुलीकडचे येतात. मात्र, पुन्हा पुढील बोलणी करण्यासाठी येत नाही. दुष्काळामुळे या गावात कोणीच मुलगी देण्यास तयार नाहीत, असे त्यांनी सांगितले.  सध्या गावात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे तरूणांना रोजगार नाही. पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांसाठी चारा विकत आणावा लागत आहे. दर दोन वर्षांनी गावाला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. कौडगाव म्हणजे दुष्काळ असे समीकरणच झाल्याचे त्यांनी सांगितले.  आमच्या जमिनी कौडगाव वसाहतीत (एमआयडीसी) गेल्या आहेत. येथे कारखाने होणार असल्याची स्वप्न आम्हा गावकऱ्यांना दाखवण्यात आली. जमिनी ताब्यात घेतल्या. याला सात ते आठ वर्षे झाली, मात्र अच्छे दिन आलेच नाहीत. त्या जमिनीवर गुरे चारण्यासाठी आम्हाला परवानगी नाही. तेथील चौकीदार आमच्या गुरांना आतही फिरकू देत नाहीत. याठिकाणी उद्योग तर कोणताच नाही. नेमकं कारण काय? कशामुळे? शासनाची अशी उदासिनता का आहे? असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला.

महादेव बापूराव थोरात म्हणाले की, गावात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे. कौडगावात होणाऱ्या एमआयडीसीचे काम ठप्प आहे. भूमीहिन शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही. कोणीही शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे येथील तरूण भरकटताना दिसतोय. काही तरूण पुणे-मुंबई सारख्या शहरात जात आहेत.

गावात भूमीहिन शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यांची परिस्थिती सरकारला काय माहित? येथील तरूणांची लग्न ठरत नाहीत. कर्नाटकमध्ये सोयरीक जुळवावी लागतेय.  शासनाने आम्हाला धर्मसंटात टाकले आहे. नोकऱ्यांची अश्वासने फोल ठरली आहेत. गावांतील युवकांची बेकारी वाढल्यामुळे युवक दिशाहीन अवस्थेकडे गेला असल्याचे थोरात म्हणाले.

कौडगाव एमआयडीसी प्रकल्प नेमका काय?
२०१२ मध्ये कौडगाव एमआयडीसीला सरकार दरबारी मान्यता मिळाली. २५०० एकरवर हा प्रोजेक्ट होणार होता. येथील प्रस्तावित ५० मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जेवर आधारित वीज निर्मिती करण्यात येणार आहे. महानिर्मिती कंपनी या प्रकल्पातून उपलब्ध होणारी वीज रु. ३.०५ प्रति युनिट ने महावितरणला विकणार असे अपेक्षित आहे.

का महत्वाचा आहे प्रकल्प ?
उस्मानाबाद सारख्या मागासलेल्या भागात या प्रकल्पामुळे काही प्रमाणात रोजगार निर्मिती होईल परंतु अर्थकारणाला चालना मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी असून निती आयोगाने विशेष कार्यक्रम राबविण्यासाठी निवडलेल्या जिल्ह्यामध्ये आता याचा समावेश केला आहे. जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकास नसल्यामुळे जिल्ह्याचे अर्थकारण शेती केंद्रीत असून भौगोलिकदृष्टया हा जिल्हा दुष्काळप्रवण क्षेत्रात मोडतो. त्यामुळे येथील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात औद्योगिक प्रकल्प आणण्याच्या अनुषंगाने एम.आय.डी.सी. च्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित करण्याचे ठरले. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणाला व पर्यायाने रोजगार निर्मितीला चालना मिळेल.