मोहन अटाळकर, अमरावती

गेल्या निवडणुकीत विदर्भातील दहापैकी आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवूनही पाच ते दहा टक्क्यांपर्यंतच जनाधार उरलेल्या बहुजन समाज पार्टीची कामगिरी या वेळी कशी राहील, याचे अनेकांना औत्सुक्य आहे. बसपाने या वेळी समाजवादी पक्षासोबत युती करून विदर्भात दहा जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ही युती कुणाच्या पथ्यावर पडणार, हा कळीचा प्रश्न ठरला आहे.

गेल्या निवडणुकीत बसपाने घेतलेल्या मतांमुळे धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पडून भाजप-शिवसेनेला त्याचा लाभ झाल्याचे सांगितले गेले खरे, पण बरेच ठिकाणी फारसा फरक जाणवला नाही. बसपाच्या उमेदवारांना मिळालेली मते ही विजयी आणि दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांच्या मतांच्या फरकाच्या तुलनेत बहुतांश मतदारसंघात बरीच कमी आहेत. विदर्भातील अमरावती, वर्धा, रामटेक आणि नागपूर या मतदारसंघांमध्ये बसपाच्या उमेदवारांना ९० हजार ते १ लाख यादरम्यान मते पडली होती. भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या दोन मतदारसंघांत ५० हजारांपेक्षा अधिक मते घेतली, पण मतांचे हे प्रमाण ५ ते १० टक्क्यांपर्यंतच आहे. याआधीच्या निवडणुकांमध्ये बसपाच्या उमेदवारांची विदर्भात चांगली मते मिळवली, पण ते विजयाच्या समीप पोहोचू शकले नाहीत. विदर्भात २००९ च्या निवडणुकीत बसपाला मिळालेल्या एकूण मतांपैकी १ लाख २२ हजार मतांची घट २०१४ मध्ये दिसून आली होती. पण, विधानसभेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी बसपने काँग्रेसच्या विजयाचे घास हिरावून घेतले होते. गटागटांमध्ये विखुरलेल्या रिपब्लिकन पक्षांच्या तुलनेत बसपाची घोडदौड अचंबित करणारी ठरली. सामान्य दलित मतदारांमध्ये बसपाबद्दल आत्मीयता वाढत असल्याचे मतांच्या टक्केवारीतून दिसून आले आहे. या वेळी वंचित बहुजन आघाडी बसपाच्या मतपेढीला धक्का पोहचवू शकते काय, हाही औत्सुक्याचा विषय आहे.

बसपाने या वेळीदेखील सामाजिक जोडजुळणी किंवा सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग केला आहे. विविध जाती-समूहातील उमेदवार या वेळी रिंग्णात आहेत. दोघांना पुन्हा उमेदवारी बहाल केली आहे. दोन उमेदवार मुस्लीम आहेत. काँग्रेसमधून बसपात आलेल्या एकाला पक्षाने संधी दिली आहे. काही ठिकाणी बहुरंगी लढती झाल्यास समर्पित असणाऱ्या बसपाची भूमिका अधिकच महत्त्वाची ठरणार आहे. या वेळी कोण-कुणाचे नुकसान करणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

बसपाची परिस्थिती चांगली- चेतन पवार

बसपाने विदर्भात सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. बसपाची स्थिती चांगली आहे. समाजवादी पक्षासोबत युती असल्याने त्याचा लाभ निश्चितपणे मिळेल. बसपाच्या नेत्या मायावती, खासदार अशोक सिद्धार्थ, महाराष्ट्राचे प्रभारी प्रमोद रैना, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विदर्भात सभा होणार आहेत.

– चेतन पवार, प्रदेश उपाध्यक्ष, बसपा

बसपाचे विदर्भातील उमेदवार

’ बुलढाणा- अब्दुल हफीज अब्दुल अजीज

’ अकोला- भाई बी. सी. कांबळे

’ अमरावती- अरुण वानखडे

’ रामटेक- सुभाष गजभिए

’ नागपूर- मोहम्मद जमाल

’ वर्धा- डॉ. शैलेश कुमार अग्रवाल

’ भंडारा-गोंदिया- डॉ. विजया नांदुरकर

’ गडचिरोली-चिमूर- दिलीप मंगाम

’ चंद्रपूर- सुशील वासनिक

’ यवतमाळ-वाशिम- अरुण किनवटकर