News Flash

निष्ठा पक्षाशी आणि व्यवसायाशी! भाजपचा सारथी- गुलाबसिंग तन्वर

हेलिकॉप्टर भाडय़ाने पुरवण्याचा व्यवसाय त्यांनी अजय देवगणच्या ‘कच्चे धागे’ चित्रपटापासून सुरू केला

लिझ मॅथ्यू/ प्रणव मुकुल, नवी दिल्ली

ही गोष्ट १९९९ची. हेलिकॉप्टर भाडय़ाने पुरवण्याचा व्यवसाय त्यांनी अजय देवगणच्या ‘कच्चे धागे’ चित्रपटापासून सुरू केला. आज गुलाबसिंग तन्वर भाजपच्या निवडणूक प्रचाराचा एक भाग आहेत. त्यांची ‘सारथी एअरवेज’ अमित शहा आणि राजनाथ सिंग यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना प्रचार दौऱ्यांसाठी विमाने आणि हेलिकॉप्टर पुरवते.

तन्वर इंडियन एअरलाईन्सचे निवृत्त वैमानिक आहेत. भाजप आणि त्यांचे नाते कुशाभाऊ ठाकरे आणि भैरोसिंग शेखावत यांच्यापासूनचे. ते भाजपशिवाय अन्य कोणत्याही राजकीय पक्षांना हेलिकॉप्टर पुरवत नाहीत. ‘या व्यवसायात निष्ठा महत्त्वाची. तीच तर आपली सर्वात मोठी मालमत्ता’, असा त्यांचा विश्वास आहे.

निवडणुकांच्या हंगामात दिल्ली विमानतळावर तन्वर हा सर्वाच्या ओळखीचा चेहरा. या काळात तन्वर भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांसह विमानांमध्ये दिसतात. किंबहुना भाजपच्या मोठय़ा नेत्यांना त्यांच्याच विमानांतून पाठवले जाते. काही वेळा मी नेते जेथे उतरणार असतात, तेथे स्वागतालाही उपस्थित असतो, असे तन्वर सांगतात. या बद्दलची एक आठवण ते सांगतात, ‘तू आदमी है या भूत? कभी इधर कभी उधर’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा विनोदाने म्हणाले होते.

‘मी एक उद्योजक आहे. परंतु भाजपचा सदस्य या नात्याने मी पक्षाच्या नेत्यांसह प्रवासही करतो. काहीवेळा प्रवासात ते अनेक गोष्टींवर बोलतात. समजा, उद्या मी अन्य पक्षांच्या नेत्यांसोबत प्रवास केला तर मी आणि माझ्या पक्षाच्या नेतेही अस्वस्थ होतील. हे मला अयोग्य वाटते. म्हणून मी ते टाळतो,’ भाजपशी असलेली बांधिलकी तन्वर व्यक्त करतात.

तन्वर यांचे भाजपशी व्यावसायिक संबंध कसे आहेत, असा स्वाभाविक प्रश्न उपस्थित होतो. यावर तन्वर यांचे उत्तर असे- ते (भाजपचे नेते) प्रत्येक रुपयासाठी घासाघीस करतात. पण एकदा व्यवहार ठरला की त्रास देत नाहीत. पैसे वेळेवर देतात आणि मुख्य म्हणजे धनादेशाने देतात.  तन्वर यांनी १९९७मध्ये वैमानिकाच्या नोकरीला राम राम ठोकून भाडय़ाने विमाने पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला. परंतु या व्यवसायात त्यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. ‘या व्यावसायिक अडीअडचणींच्या काळात भाजप आणि भाजपनेते माझ्यामागे उभे राहिले. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि माजी उपराष्ट्रपती शेखावत यांनी प्रथम मला युवा मोर्चात सामील होण्यास सांगितले,’ असे तन्वर म्हणाले. भाजपशी जोलेले हे नाते तन्वर आजही जोपासत आहेत.

खासगी विमाने, हेलिकॉप्टरची संख्या ३४९

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) आकडेवारीनुसार १९९३मध्ये या व्यवसायात ११ खासगी संस्था होत्या आणि त्यांच्याकडे २७ विमाने होती. आता अशा संस्थांची संख्या १०९ वर गेली आहे. तर त्यांच्याकडील विमाने आणि हेलिकॉप्टरची संख्या ३४९ झाली आहे. मोठय़ा राजकीय पक्षांनी गेल्या पाच वर्षांत छोटी विमाने आणि हेलिकॉप्टर यांच्या भाडय़ापोटी ५०० कोटी रुपये खर्च केल्याची आकडेवारी आहे. या खासगी संस्थांनी गेल्या पाच वर्षांत ३-७ टक्के नफा कमावला आहे. या बाबतीत तन्वर सांगतात, ५ ते १० टक्के आगाऊ भाडे दिले जाते, उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यावर देण्यात येते.

तन्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाचे भाडे..

’छोटय़ा म्हणजे ‘बेल २०६डी’ हेलिकॉप्टरचे तासाचे भाडे ६० हजार ते ७० हजार रुपये ’मोठय़ा आणि एक्झिक्युटिव्ह म्हणजे बेल ४१२, ऑगस्टा१३९ आणि युरोकॉप्टर ईसी१५५ हेलिकॉप्टरचे तासाचे भाडे अडीच ते तीन लाख रुपये  ’निवडणुकीच्या हंगामात मागणी वाढल्याने भाडे ५ ते १० टक्क्य़ांनी वाढते, परंतु अंतर्गत स्पर्धेमुळे काही विकसित बाजारपेठांमध्ये ते निम्मे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 3:57 am

Web Title: businessman gulab singh tanwar loyalty with bjp party
Next Stories
1 मोदी यांना दिलासा देण्याचा निर्णय एकमताने नव्हे!
2 मोदींविरोधी तक्रारींवर निर्णय घ्या!
3 काँग्रेस-भाजप छुपा समझोता असल्याचा मायावतींचा आरोप
Just Now!
X