प्रसाद रावकर

नायगाव परिसरतील पुरंदरे मैदान वाचविण्यासाठी क्रीडापटूंकडून मोहीम

क्रिकेटपटू, फुटबॉलपटू, खो खो – कबड्डीपटू घडविणाऱ्या नायगाव परिसरातील पुरंदरे मैदानात केईएम रुग्णालयांतील डॉक्टरांसाठी क्बल थाटण्याचा घाट घालण्याचे प्रयत्न सुरू असून त्याच्या निषेधार्थ गेली अनेक वर्षे या मैदानाशी नाळ जुळलेल्या क्रीडापटुंनी आंदोनल उभे केले आहे. भविष्यात क्लबमुळे सर्वसामान्यांना हे मैदान कायमचे बंद होण्याची भिती आहे. त्यामुळे आता या मैदानाच्या बचावासाठी एकवटलेल्या क्रीडापटूंनी समाजमाध्यमांचा आधार घेत मैदान वाचविण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन या परिसरातील रहिवाशांना करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.

नायगाव परिसरामध्ये खेळाची चार मैदाने आहेत. त्यापैकी पोलीस ग्राऊंडवर प्रशिक्षण आणि संचलन होत असते. त्याच्या समोरील एक मैदान पोलिसांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे या दोन्ही मैदानांवर या परिसरातील मुलांना खेळायला मिळत नाही. जवळच सदाकन ढवण मैदान असून तेथे कायम विविध जत्रांचे आयोजन करण्यात येते.

त्यामुळे पुरंदरे मैदानामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी शिवडी, नायगाव, दादर परिसरातील मुले येत असतात. तसेच क्रिकेटचे अनेक सामने या मैदानात अधूनमधून होत असतात. त्यामुळे क्रिकेटपटूंचे या मैदानाशी एक वेगळेच नाते जुळले आहे.

काही वर्षांपूर्वी केईएम रुग्णालयातील डॉक्टरांसाठी पुरंदरे मैदानामध्ये क्लब सुरू करण्याचा घाट पालिकेने घातला होता. मात्र या परिसरातील रहिवाशी आणि क्रीडापटूंकडून त्यास कडाडून विरोध करण्यात आला होता.

त्यानंतर पुरंदरे मैदानाची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली तेथील आसन व्यवस्था (स्टेडियम) तोडण्यात आली. मात्र दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा क्लब उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजताच रहिवाशी आणि क्रीडापटूंनी हे काम बंद पाडले होते. मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांबरोबर क्रीडापटू आणि रहिवाशांच्या बैठकाही झाल्या. स्थानिक रहिवाशी आणि क्रीडापटूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तेथे सुरू असलेल्या कामाला स्थगिती दिली होती. मात्र या मैदानात क्लब उभारण्यावर पालिका ठाम आहे.

तर दुसरीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे क्रीडापटू आणि रहिवाशी प्रचंड संतप्त झाले आहेत.

पुरंदरे मैदान हे येथील सामान्यांच्या मुलांना खेळण्यासाठी सोयीस्कर होते. याशिवाय येथील अनेक खेळांडूना हे मैदान मोठा आधार ठरले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांचे या मैदानाशी एक वेगळे नाते जडले आहे. त्यामुळे ते वाचविण्यासाठी प्रत्येक जण रस्त्यावर उतरला आहे. तसे चित्र गेले काही दिवसांपासून येथे पाहायला मिळत आहे. रहिवाशी मैदानासाठी एकजुटीने लढतील, असा विश्वास येथील खेळाडू आणि नागरिकांनी व्यक्त केला.

‘सामान्यांना शुल्क परवडणार नाही’

क्लब उभारल्यानंतर या मैदानात प्रवेश करण्यासाठी शुल्क आकारण्यात येईल. या परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शुल्क भरुन मैदानात खेळणे शक्य होणार नाही. त्यामुळे मैदानात क्लब उभारू नये, अशी मागणी मैदान वाचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुरंदरे सेवा समितीने केले आहे. वारंवार मागणी करुनही राजकारणी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय निवडून नायगाव, परळ, लालबाग परिसरातील रहिवाशांनी निषेध नोंदवून राजकारण्यांना धडा शिकवावा, असे आवाहन क्रीडापटुंकडून करण्यात आले आहे. समाजमाध्यमांचा आधार घेत क्रीडापटुंनी नायगाव आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना निषेध मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली आहे. तर समाजमाध्यमांवरील संदेश  निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या  उमेदवारांच्या वाचनात आल्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत.