मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभा निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. यासंबंधीचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावा असे कोर्टाने म्हटले आहे.

कोणाला निवडणूक लढवण्यापासून न्यायालयाला रोखता येणार नाही. तसा कायदेशीर अधिकार एनआयए कोर्टाकडे नाही. निवडणूक अधिकारीच यासंबंधी निर्णय घेऊ शकतात. आरोपी नंबर १ ला न्यायालय निवडणूक लढवण्यापासून रोखू शकत नाही असे कोर्टाने म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्याच्या मागणीसाठी निसार अहमद सय्यद बिलाल यांनी विशेष एनआयए कोर्टात याचिका दाखल केली होती. निसार अहमद यांचा मुलगा सय्यद अझहर याचा मालेगाव बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. साध्वी प्रज्ञा यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. साध्वी प्रज्ञा भोपाळमधून भाजपाच्या उमेदवार असून दिग्विजय सिंह विरुद्ध त्यांची लढत आहे.