रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांकडून नाकाबंदी करून तपासणी चालू असता अश्लील शिवीगाळ आणि आरडाओरडा करत शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे आणि त्यांच्या इतर १६ कार्यकर्त्यांविरुद्ध नोंदवण्यात आला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी व राज्य पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. नीलेश राणे यांची गाडी या चेकपोस्टवर तपासत असताना वादावादीला सुरुवात झाली. या चेकपोस्टवर गर्दी का आहे, हे पाहण्यासाठी थांबलेल्या जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप यांनादेखील नीलेश राणे यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ केली.

रत्नागिरीपासून सुमारे १३ किलोमीटर अंतरावर हातखंबा येथील एस. टी  थांब्याजवळ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, बाहेरगावाहून शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या रस्त्यांवर लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तपासणी नाकी तयार करण्यात आली आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार असलेले नीलेश राणे कार्यकर्त्यांसह हातखंबा तपासणी नाक्यापाशी आले असता तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांच्या गाडीची तपासणी सुरू केली.

यावेळी अश्लील भाषेत शिवीगाळ व आरडओरडा करत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची धमकी देत शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी नीलेश आणि त्यांच्या सोबत असलेल्या १६ जणांवर ग्रामीण पोलीस स्थानकात गुहा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी या प्रकरणी नोंदवलेल्या तक्रारीमध्ये पुढे म्हटले आहे की, याच वेळी शिवसेना पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप यांनाही नीलेश राणे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली व मारण्याच्या उद्देशाने साथीदारांसह म्हाप यांच्या अंगावर धावून गेले.

सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा धोका निर्माण झाल्याने राणेंसह इतरांस पोलिसांनी निघून जाण्याचा निर्देश देऊनही त्याच ठिकाणी थांबून असभ्य वर्तन केले, म्हणून पोलिसांनी नीलेश राणे यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेचे व्हिडीओ कॅमेऱ्याने चित्रणही करण्यात आले आहे.