ओडिशामधील केओंजर येथून लोकसभा निवडणूक जिंकलेल्या चंद्राणी मुर्मू यांनी इतिहास रचला आहे. चंद्राणी मुर्मू यांनी सर्वात तरुण खासदार होण्याचा मान मिळवला आहे. त्यांचं वय सध्या २५ वर्ष ११ महिने आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण खासदार होऊ किंवा राजकारणात जाऊ याचा साधा विचारही चंद्राणी मुर्मू यांनी केला नव्हता. चंद्राणी मुर्मू शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात होत्या. पण कदाचित त्यांच्या नशिबात खासदार होणं होतं.

चंद्राणी मुर्मू इंजिनिअर पदवीधर असून बी.टेक झाल्यानंतर त्या नोकरीच्या शोधात होत्या. पण एक दिवस अचानक नशिबाचं दार उघडलं आणि नवीन पटनाईक यांच्या बीजू जनता दलाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. चंद्राणी मुर्मू यांनी अनपेक्षितपण दोन वेळा खासदार राहिलेल्या भाजपाच्या अनंता नायक यांचा तब्बल ६७ हजार ८२२ मतांनी पराभव केला आणि केओंजर मतदारसंघातून विजय मिळवला.

चंद्राणी मुर्मू यांच्याआधी हरियाणाधील हिसार मतदारसंघातून दुष्यंत चौटाला सर्वात तरुण खासदार होते. ज्येष्ठ आणि प्रसिद्ध नेते ओम प्रकाश चौटाला यांचे ते नातू आहेत.

‘शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नोकरीच्या शोधात होते. मी राजकारणात खासदार म्हणून प्रवेश करेन असा साधा विचारही कधी केला नव्हता. माझी उमेदवारीही अनपेक्षित होती’, असं चंद्राणी मुर्मू यांनी सांगितलं आहे. चंद्राणी मुर्मू यांचे वडील संजीव मुर्मू सरकारी कर्मचारी असून आई उर्बशी गृहिणी आहेत.

चंद्राणी मुर्मू यांचा खासदार होण्याचा मार्ग काही सोपा नव्हता. त्यांचा मॉर्फ केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. मात्र अखेर सत्याचा विजय झाल्याचा आनंद त्या व्यक्त करत आहेत.