मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका

अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन ओपिनग बॅट्समन म्हणून मदानात उतरले, विकेटवर गेले आणि नंतर न खेळताच बाहेर आले. आता बारावा गडी म्हणून मदानाबाहेर बसलेत. ज्या टिमचा कॅप्टनच निवडणुकीत उतरण्याचे धाडस दाखवत नाही. तिथे सुनील तटकरे किस खेत की मुली आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ते पेण येथे शिवसेनेचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

‘सत्तेतून पसा आणि पशातून सत्ता’ हे या पक्षाचे धोरण आहे. मात्र भ्रष्टाचार करून सत्ता कमावण्याचा जमाना आता गेला आहे. जनता येत्या २३ तारखेला मतदानातून त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. राष्ट्रवादीची अवस्था बिकट आहे. त्यांना उमेदवार मिळत नाही. प्रचाराला वक्तेही मिळत नाही. त्यामुळे वक्तेही भाडय़ाने आणण्याची वेळ यांच्यावर आली आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गरिबी हटावचा नारा दिला आहे. त्यांच्या पणजोबा, आजी, वडील आणि आईनेही यापूर्वी असाच नारा दिला होता. पण देशातील गरिबी काही हटली नाही. नारे देण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही. आज निवडून आलो तर गरीबांना ७२ हजार रुपये देऊ असे सांगत आहेत. पण हे पसे आणणार कुठून हे सांगत नाही. काँग्रेसने चेल्या-चपाटय़ांचे भल करण्यापलीकडे काहीच केले नसल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

याउलट केंद्र सरकारने गेल्या पाच वषार्ंत ३४ कोटी जनधन खाती उघडली. या खात्यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून ८० हजार कोटी रुपये जमा केले. दलाल आणि मध्यस्तांचा भ्रष्टाचार संपुष्टात आणला. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत लोकांना शौचालये बांधून दिली. पूर्वी देशातील ४५ टक्के लोकांकडे स्वत:ची शौचालये होती. आज हे प्रमाण ९८ टक्केपर्यंत वाढले आहे. उज्ज्वला योजनेचा १३ कोटी लोकांना फायदा झाला. आवास योजनेअंतर्गत १० लाख घरांची कामे सुरूझाली. त्यातील पाच लाख पूर्णही झाली. आयुष्यमान योजनेचा २ महिन्यांत २० लाख लोकांना फायदा झाला. त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार झाले, असंघटित कामगार आणि शेतकरी वर्गासाठी पेन्शन योजना सुरू केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निवडणूक जाहिरनाम्यांवर सडकून टीका केली.

रायगड जिल्ह्यात रस्ते, रेल्वे आणि जलवाहतुकीच्या माध्यमातून विकासाचे काम सुरू झाले आहे. सिडकोच्या माध्यमातून जिल्ह्यात एकात्मिक औद्योगिक विकास प्रकल्प येऊ घातला आहे. ज्यातून १ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून आता रायगडच्या विकासाला गती मिळणार आहे. गावागावांत शेकडो कोटीं रुपयांची काम करणे शक्य होणार आहे. ही निवडणूक विकासाची आणि राष्ट्रीय अस्मितेची आहे. त्यामुळे देशाला नरेंद्र मोदींसारख्या नेतृत्वाची गरज आहे. मोदींना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी धनुष्यबाणाला मत द्या आणि गीतेंना पुन्हा एकदा निवडून दिल्लीत पाठवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनीही यावेळी आपली मनोगतं व्यक्त केली. यावेळी  सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, आमदार प्रवीण दरेकर, रामशेठ ठाकूर, माजी आमदार रविशेठ पाटील यांच्यासह शिवसेना भाजप आरपीआय युतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

रेल्वेचे इंजिन बंद पडलंय   

एकेकाळी सायकल आणि मोटरसायकल भाडय़ाने मिळत असे. पण आता रेल्वेचे इंजिन भाडय़ाने मिळत आहे. हे भाडय़ाने घेतलेले इंजिन घेऊन काही लोक फिरत आहेत. पण हे रेल्वे इंजिन बंद पडलेले आहे. त्यामुळे बंद पडलेले रेल्वे इंजिन किती फिरवले तरी त्याचा उपयोग होणार नाही. असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

शेकापचे नाव बदलून भाकाप करा

शेकाप हा पूर्वी शेतकरी आणि कामगारांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. आज मात्र हा पक्ष भांडवलदार आणि कारखानदारांचा पक्ष झाला आहे. त्यामुळे या पक्षाचे नाव बदलून भाकाप करायला हवे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शेकाप आणि जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला.