मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘पगडीवाले’ म्हणून हिणवणाऱ्या शरद पवारांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, मात्र तेच काम ‘पगडीवाल्या’ मुख्यमंत्र्यांनी करून दाखवले, शरद पवारांनी केवळ जाती-जातीत विषच कालवले, असा  आरोप महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केला.

नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी मंत्री मुंडे यांची आज, शनिवारी पाथर्डीत सभा झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. उमेदवार विखे यांच्यासह आ. मोनिका राजळे, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, शेवगावच्या नगराध्यक्ष राणी मोहिते, जि.प. सदस्य राहुल राजळे, माणिक खेडकर, सोमनाथ खेडकर, मोहन पालवे, अमोल गर्जे, नंदकुमार शेळके,अरु ण मुंडे, पांडुरंग खेडकर, काका शिंदे, अशोक आहुजा आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवार कुटुंबाच्या मुद्यावरुन आरोप करतात मात्र पवार यांनीच राज्यात अनेकांची कुटुंब फोडण्याचे उद्योग केले आहेत, मोदी यांना पवारांसारखे मुलगी, पुतण्या यांना नाहीतर सर्वसामान्यांना उमेदवारी द्यायची आहे, त्यामुळे निवडणुकीत नात्यागोत्याला थारा देऊ नका, नाते प्रत्येकालाच असते, मलाही भाऊ आहे, तो मला संपवायला निघाला आहे. स्व. गोपीनाथ  मुंडे यांची विचारधारा जपणारा कधीच संपत नसतो, मी जर मुंडे यांच्या विचारापासून दूर गेले तर जनता मला थारा देणार नाही. आपला भाऊ कधीकधी मी गोपीनाथ मुंडे यांच्या मुळेच आहे, असे सांगतो, तर कधी मुंडे यांनी मला मोठे होऊ दिले नाही असेही म्हणतो. त्याला नेमके काय म्हणायचे हे एकदा त्याने ठरवून घ्यायला हवे. वारसा केवळ मुलगाच चालवतो असे काही नसते. मुलीसुद्धा सक्षमपणे वारसा चालवतात, असेही त्या म्हणाल्या.

विखे यांना ऑपरेशन येते का हे विचारणाऱ्यांना दाढी तरी करता येते का, हे तपासुन पहावे लागेल, असा टोला मंत्री मुंडे यांनी लगावला. राष्ट्रवादीचे घडयाळ सध्या बंद पडले असून काँग्रेस पक्षाची टीका म्हणजे आभाळावर थुंकण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांच्या घरातच देशाचे पंतप्रधानपद अनेक वर्ष होते मात्र तरीही ते आता गरिबी हटाव म्हणत आहेत. म. गांधींसारखा चष्मा व नाव त्यांनी वापरले मात्र त्यांना खरे गांधी समजलेच नाहीत. ‘नोटा’वर असलेल्या गांधी यांच्यावरच त्यांचे प्रेम आहे. त्यांच्या काळात पंतप्रधान फक्त लिहिलेली भाषणे वाचून दाखवताना दिसत होती पण नरेंद्र मोदी आता प्रत्येकाशी ‘मन कि बात’ करत आहेत. राहुल गांधी देशद्रोहाचे कलम काढून टाकण्याची भाषा बोलतात त्यांची ही भूमिका मुस्लिमांही मान्य नाही. ब्रिटिशांनी सत्ता भोगली त्याच्या निम्मे वर्ष काँग्रेसनेही सत्ता भोगली, मात्र ब्रिटिशांनी केले नाही इतके अत्याचार काँग्रेसने केले असाही आरोप मुंडे यांनी केला.

शेतमजूर व शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचे काम भाजप करणार असल्याने आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तोंडात मारल्यासारखे झाले आहे, असा उल्लेख करुन मुंडे यांनी केला. सध्या अनेकांना आपण आमदार व खासदार व्हावे असे वाटते, पवार यांनी येथेही एकाला शब्द दिला, मात्र तुम्हाला आमदार, खासदार करु  असा शब्द त्यांनी आत्तापर्यंत पन्नास जणांना दिला असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला. लोकसभेची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे.

कायदा समजणाऱ्या विखे यांना निवडून द्यायचे की कायदा मोडणाऱ्याला हे ठरवण्याची वेळ आली आहे, असेही त्या म्हणाल्या.