राहुल गांधी यांचा टोला

वृत्तसंस्था, भिंड, मध्य प्रदेश

‘चौकीदार चोर है’ या घोषणेवरूनच सर्वोच्च न्यायालयात बुधवारी दिलगिरी व्यक्त केलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही घोषणा काँग्रेस पक्ष किंवा आपण तयार केलेली नसून, या घोषणेचे प्रणेते युवक आणि शेतकरी असल्याचे सांगितले.

‘चौकीदार चोर है’ ही घोषणा काँग्रेसने लोकप्रिय केली आहे. काँग्रेसच्या प्रचार सभा किंवा पदयात्रांमध्ये हीच घोषणा दिली जाते. ही घोषणा कशी काय तयार झाली, अशी विचारणा मला केली जाते. ही घोषणा काँग्रेस पक्ष किंवा मी स्वत: तयार केलेली नाही. ही घोषणा कशी तयार झाली याचा किस्साही राहुल गांधी यांनी या वेळी सांगितला. छत्तीसगडमध्ये जाहीर सभेत बोलताना चौकीदाराने दोन कोटी रोजगार आणि प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. यावर १० ते १५ युवकांनी उठून ‘चोर है’ अशा घोषणा दिल्या. या युवकांच्या घोषणा मला ऐकू आल्या नव्हत्या. म्हणून काय घोषणा दिल्या, अशी विचारणा केली असता युवकांनी ‘चोर है’ अशा घोषणा दिल्याचे सांगितले. यावरून ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा तयार झाली आणि लोकप्रिय झाली. ही घोषणा देशातील युवक, शेतकरी आणि कामगारांनी तयार केल्याचेही त्यांनी सांगितले.  काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास लोकांचे प्रश्न सोडविण्यावर भर देईल, याचा पुनरुच्चार गांधी यांनी केला.