भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशात व महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मिळालेला जबरदस्त विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा व जनतेचा विजय आहे. महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना-रिपाई-राष्ट्रीय समाज पक्ष-शिवसंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीला जनतेने प्रचंड विश्वास ठेऊन विजयी केले. आपण जनतेला साष्टांग दंडवत घालून अभिवादन करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत केले. लोकसभा निवडणुकीतील यशाबद्दल भाजपा प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत होते की, या निवडणुकीत प्रथमच सत्तेतील सरकारच्या बाजूने लाट आहे व हीच बाब निवडणुकीच्या निकालात दिसली. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे मी अभिनंदन करतो. विरोधी पक्षांनी निवडणुकीत दुष्काळाचेही राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण जनतेने त्यांना नाकारले व महायुतीवर विश्वास दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व राज्यातील महायुतीचे सरकारच जनतेचे प्रश्न सोडवू शकते. लोकसभा निवडणुकीतील विजयाचा आनंद आहे, त्याबरोबर जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यासाठी सर्वांना आधीपेक्षा अधिक काम करावे लागेल.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले. उद्धव ठाकरे यांनी महायुतीमध्ये चांगला समन्वय साधल्यामुळे विजय मिळाला, असे ते म्हणाले. रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या व राज्यातील वंचितांना महायुतीशी जोडण्याचे काम केले. त्यांचेही आपण आभार मानतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की या निवडणुकीतही २०१४ प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच लाट होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व जातीधर्माचे नेते आहेत. आपला समाज या निवडणुकीत मोदीजींसोबतच राहिला.