डोंबिवली : काँग्रेस आघाडीच्या जाहीरनाम्यात सामान्यांना भरघोस आश्वासने देण्यासारखे काही नाही. ६० वर्षांत दिलेल्या गरिबी हटावसारख्या त्याच घोषणा आहेत. हा जाहीरनामा म्हणजे कोंबडी विकण्याचा धंदा आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी डोंबिवलीत महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजय संकल्प सभेत केली. वर्षांनुवर्षे गरिबी हटावचे नारे देणाऱ्या आघाडी सरकारकडे जाहीरनाम्यात सामान्यांना आश्वासन देण्यासारखे काही नाही म्हणून वर्षांला गरिबांना ७२ हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा म्हणजे एखाद्याने एका कोंबडी विक्रेत्याला तू ६४० कोंबडय़ा विकून ये मी तुला एक लाख रुपये देतो, असा व्यवहार आहे. हा जाहीरनामा म्हणजे कोंबडी विकण्याचा धंदा आहे, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला. या जाहीरनाम्यातून सामान्यांचा विकास नाही तर फक्त सामान्यांचे मनोरंजन होणार आहे, असे ते म्हणाले.