रीतिका चोप्रा/अनंतकृष्णन जी. 

५ एप्रिलपासून एकाही तक्रारीवर चर्चा नाही 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातील आचारसंहिता भंगाबाबतच्या काँग्रेसच्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे, पण या तक्रारींबाबत निवडणूक आयोगाने आतापर्यंत एकदाही चर्चा केली नसल्याची माहिती ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाली आहे.

मोदी आणि शहा यांच्या कथित आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी काँग्रेसने ५ एप्रिलला निवडणूक आयोगाकडे प्रथम तक्रार केली होती. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्यासह आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांचा समावेश असलेल्या निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या या तक्रारीवर ५ एप्रिलपासून आजतागायत चर्चाही केलेली नाही.

यानंतर आणखी चार तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या. निवडणूक आयोगातील सर्व आयुक्तांची बैठक साधारणपणे आठवडय़ातून दोनदा घेण्यात येते. पहिली तक्रार नोंदविण्यात आल्यापासून मुख्य निवडणूक आयुक्तांसह तिन्ही आयुक्तांनी सहा वेळा एकत्र बैठक घेणे आवश्यक होते.

५ एप्रिलची तक्रार मोदी यांनी वर्धा येथे १ एप्रिलला केलेल्या भाषणाविरोधात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने केलेल्या भाषणात मोदी म्हणाले होते की काँग्रेस पक्ष बहुसंख्याक बहुल ठिकाणाहून पळून बहुसंख्यच अल्पसंख्याक असलेल्या ठिकाणी आश्रयाला जात आहे. या प्रकरणाबाबत ‘इंडियन एक्स्प्रेस’ने निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवला होता. त्याला आयोगाचे प्रवक्ते एस. शरण यांनी उत्तर दिले आहे. त्यात ते म्हणतात, ‘आयोगासमोर मोदी, शहा आणि काँग्रेसबाबतच्या ज्या प्रलंबित तक्रारी आहेत त्यावर ३० एप्रिलच्या बैठकीत चर्चा होणार आहे. आणखी एका बैठकीची गरज भासल्यास १ मे रोजी आयोगाची बैठक घेऊन तक्रारींचा निपटारा केला जाईल.’

काँग्रेसची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्धची अन्य एक तक्रार त्यांच्या ६ एप्रिलच्या नांदेडमधील वक्तव्यासंदर्भात आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर आज सुनावणी

प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा आचारसंहितेचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी याचिकेद्वारे केला असून त्यावर मंगळवारी सुनावणी घेण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. मोदी आणि शहा आचारसंहितेचा भंग करीत असून निवडणूक आयोग देव यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करीत नसल्याचे देव यांचे वकील अभिषेक सिंघवी यांनी सांगितले.