समीर भुजबळांविरुद्ध १५, तर पवन पवारांवर १० गुन्हे; हेमंत गोडसेंवर एक गुन्हा
नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये संपत्तीबरोबर दाखल गुन्ह्य़ांची जणू स्पर्धा असल्याचे प्रतिज्ञापत्रात दिसत आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात कारवाईला तोंड देणारे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे ६५ कोटींहून अधिक मालमत्ता असून १६ कोटींचे कर्ज आहे. समीर यांच्यावर १५ गुन्हे दाखल आहेत. वंचित बहुजन विकास आघाडीचे पवन पवार यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता ९० लाखांहून अधिक आहे. त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत १० गुन्हे दाखल आहेत. सेना-भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि कुटुंबीयांच्या नावावर सुमारे साडेसहा कोटींची संपत्ती आहे. गोडसे यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
नाशिक मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ आणि कुटुंबीयांची आर्थिक सुबत्ता प्रतिज्ञापत्रात अधोरेखित झाली आहे. समीर यांचे २०१७-१८ चे वार्षिक उत्पन्न पावणेपाच लाख रुपये इतके आहे. त्यांच्या स्वत:च्या नावे असणारी स्थावर मालमत्ता चार कोटी ९१ लाखांहून अधिक आहे. याशिवाय वेगवेगळ्या योजनांमध्ये त्यांनी ७२ लाखांहून अधिकची गुंतवणूक केलेली आहे. आर्मस्ट्रॉग इन्फ्रास्ट्रक्चर, आर्मस्ट्रॉग वायनरी, भुजबळ वाइन्स, चंद्राई वायनरी यार्ड, जानकाई ज्ञान प्रबोधिनी फाऊंडेशन, लाजवंती डेव्हलपर्स, शिराज वायनरी आदी ठिकाणी जवळपास तीन कोटींची गुंतवणूक आहे. समीर यांच्या कुटुंबावर १६ कोटींचे कर्जही आहे.
सक्त वसुली संचालनालयाने अडीच वर्षांपूर्वी बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात भुजबळ यांच्यावर कारवाई केली होती. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा अधिक मालमत्ता, मनी लॉन्ड्रिंग, शासनाचे नुकसान आदी कारणांवरून वेगवेगळे १५ गुन्हे दाखल आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांच्या कुटुंबाकडे एकूण ८६ लाखांहून अधिकची अचल संपत्ती आहे. कुटुंबीयांची एकूण मालमत्ता ९० लाखांहून अधिक आहे. पवार यांनी व्यवसाय शेती दाखविला असून त्यांच्याविरुद्ध १० गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, प्राणघातक हल्ला, लूटमार, अवैधपणे शस्त्र बाळगणे आदींचा समावेश आहे. दोन गुन्ह्य़ांतून त्यांची मुक्तता झाली असून सहा गुन्ह्य़ांचा पोलीस तपास सुरू असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सेना-भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हेदेखील कोटय़वधींचे धनी आहेत. गेल्यावेळी लोकसभेत गेल्यानंतर त्यांच्या वार्षिक उत्पन्नात घट झाल्याचे प्रतिज्ञापत्र दर्शविते. दुसरीकडे पत्नी अनिता यांच्या वार्षिक उत्पन्नात मात्र वाढ झाल्याचे लक्षात येते. गोडसे यांची स्वत:ची चल संपत्ती सहा कोटी १७ लाखांहून अधिक असून गतवेळी ती तीन कोटी ९९ लाख इतकी होती. पत्नी अनिता यांची एक कोटी २६ लाखाची चल संपत्ती आहे. दोन्ही मुलांच्या नावे ४० लाख ४५ हजारांची चल संपत्ती आहे. पाच वर्षांत गोडसे यांच्यावरील कर्जातही वाढ झाली आहे. त्यांच्यावर तीन कोटी २८ लाखांचे कर्ज आहे. मागील निवडणुकीत कर्जाचा आकडा सव्वादोन कोटींच्या आसपास होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2019 1:21 am