दोन ते तीन दिवस प्रचारबंदीची मागणी

मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केल्यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच त्या वेळी माध्यमांशी बोलताना राजकीय वक्तव्य केल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे. त्यावरून पंतप्रधानांवर दोन ते तीन दिवसांची प्रचारबंदी करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

याखेरीज भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही आचारसंहितेचा भंग केल्यावरून त्यांच्यावर ७२ तासांची प्रचारबंदी करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे  भूमिका मांडली. अहमदाबादमध्ये मतदान केल्यानंतर पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधानांचे पद मोठे आहे, अशा वेळी मोदी वारंवार आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्याचे अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले.  पंतप्रधान वारंवार नियम डावलत असून, निवडणूक आयोगाची त्यांना पर्वा नाही असे सिंघवी यांनी सांगितले. आयोगाने जर दखल घेतली नाही तर आयोगाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी भीती सिंघवी यांनी व्यक्त केली.