जळगावमधील अमळनेर येथील भाजपा-शिवसेनेच्या सभेत बुधवारी तुफान राडा झाला. यावेळी भाजपाचे माजी आमदार बी. एस. पाटील यांना बेदम मारहाण करण्यात आली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ समर्थकांकडून हा राडा घालण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि भाजपाचे इतर आमदार उपस्थित होते. यावेळी महाजन यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. तत्पूर्वी, या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी गिरीश महाजन येत असताना त्यांचा ताफा पाडळसरे धरण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रोखला होता.

भाजपाच्या नेत्या स्मिता वाघ यांना येथून लोकसभेचे तिकीट मिळेल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना काही कारणाने उमेदवारी नाकारल्याने स्मिता वाघ यांचे पती आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी हा गोंधळ घातला, असे सांगण्यात येत आहे. मात्र, वाघ यांनी याचा इन्कार केला आहे.

या गोंधळाबाबत स्पष्टीकरण देताना उदय वाघ म्हणाले, अमळनेरमधील भाजपाचे लोकसभेचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यासाठी ही सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये डॉ. बी. एस. पाटील उपस्थित होते. याआधी पाटील यांनी भाजपाच्या नेत्या स्मिता पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पाटील यांना या सभेतून बाहेर पाठवावे असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. मात्र, त्यांना हटवण्यात न आल्याने त्यांचा राग अनावर झाल्याने हा प्रकार घडला.

दरम्यान, गिरीश महाजन यांनी भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या या राड्याचे निषेध केला आहे. अशा प्रकारे जाहीररित्या सभेमध्ये गोंधळ घालणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, या प्रकरणी संबंधीतांवर कारवाईबाबत त्यांनी कोणतीही भुमिका स्पष्ट केली नाही.