लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा घवघवीत यश मिळालं असून २०१४ ची पुनरावृत्ती करत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाप्रणीत लोकशाही आघाडीने दमदार विजय मिळवला आहे. २०१४ मध्ये भाजपाने २८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी तब्बल ३०० हून अधिक जागांवर धडक दिली असल्याने एकहाती सत्ता स्थापित करण्याची क्षमता पुन्हा कायम राखली आहे. दुसरीकडे काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला असून सभागृहातही नाचक्की होणार आहे. काँग्रेसला फक्त ५२ जागा मिळाल्या असल्याने पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपद त्यांच्या हातून निसटलं आहे.

नियमानुसार लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी विरोधी पक्षाकडे किमान १० टक्के जागा असणं गरजेचं असतं. म्हणजेच ५४३ खासदारांपैकी किमान ५५ खासदार असणाऱ्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाचा मान दिला जातो. काँग्रेसकडे फक्त ५२ खासदार असल्याने विरोधी पक्ष नेतेपदावर ते दावा करु शकत नाहीत.

काँग्रेस पक्षावर ही दुसऱ्यांदा वेळ आली आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ४४ जागा मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपद मिळालं नव्हतं. यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी आपली विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेलं युपीएच्या ६० खासदारांनी स्वाक्षरी केलेलं संमतीपत्र सादर केलं होतं. कर्नाटकमधील गुलबर्गा येथून लोकसभेच्या रिंगणात असलेल्या मल्लिकार्जून खर्गे यांचा पराभव झाल्याने यावेळी विरोधी पक्षनेतेपदासाठी नेमकी कोणती रणनीती काँग्रेस आखणार आहे हे पहावं लागेल.