पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

जुनागड : गुजरातचे नेते काँग्रेसकडून नेहमीच लक्ष्य होत असल्याचे सांगत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.

जुनागड येथील प्रचारसभेमध्ये मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून काँग्रेसचे वाभाडे काढले. काँग्रेसने सत्तेद्वारे फक्त लोकांना लुटण्याचेच काम केले. काँग्रेसच्या नेत्यांकडे पोती भरून नोटा मिळत आहेत, असे मोदी म्हणाले. गुजरातमधील नेत्यांबाबत काँग्रेसने कायम दुजाभाव राखला याची आठवणही मोदी यांनी करून दिली.

मोदी म्हणाले की, नेहरू- गांधी कुटुंबाने कायम सरदार पटेल, मोरारजी देसाई यांना लक्ष्य केले आणि आता ते माझ्याबाबतीतही तेच करीत आहेत. आपल्या विचारसरणीशी एकनिष्ठ असलेल्या मोरारजी यांचा उत्कर्ष होत होता. मात्र, त्यांनाही थारा देण्यात आला नाही. सरदार पटेल यांची तर त्यांनी कायम उपेक्षा केली आणि त्यांच्याविषयी कायम अनुद्गार काढले. सरदार पटेल यांच्या कार्याला जुनागड आणि गुजरातमधील लोक विसरू शकतील का, ही भावनिक साद घालत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नातेवाईकांकडे प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये सापडलेल्या पैशांवरून मोदी यांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर आसूड ओढले. काँग्रेसच्या अनेक घोटाळ्यांच्या मालिकेमध्ये  ‘तुघलक रोड’वरील प्रकार हा पुराव्यांसह जोडला गेल्याचे त्यांनी सांगितले. गरीब आणि गर्भवती स्त्रीयांसाठीचा पैसा काँग्रेसचे नेते लुबाडत असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या चार दिवसांमध्ये पडलेल्या प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये काँग्रेस नेत्यांकडे पोतीभर पैसे मिळत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला कर्नाटक हे काँग्रेससाठी पैशाचे केंद्र होते, आता त्यात मध्य प्रदेशचीही भर पडली आहे. छत्तीसगढ आणि राजस्थानमध्येही हीच परिस्थिती असून केवळ नागरिकांना लुटण्यासाठी काँग्रेसला सत्तेत स्वारस्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मी जेव्हा दहशतवाद संपविण्याची भाषा करतो, तेव्हा काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मलाच हटविण्याची भाषा करतात. दिवस- रात्र काँग्रेसच्या टेप रेकॉर्डरवर ‘मोदी हटाव’खेरीज दुसरी कोणती घोषणा नसते. त्याशिवाय काँग्रेसकडे कोणताही कार्यक्रम नाही.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान