आसाममध्ये २७ मार्च रोजी विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बिहपुरिया येथील लखीमपुर येथे प्रचारसभा घेतली. या वेळी आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेसवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. “काँग्रेस हा असा पक्ष आहे जो गरज असेल तेव्हाच विश्वासघात करतो. आसाममध्ये आपल्या कार्यकाळात काँग्रेसने केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी काम केलं. सर्वसामान्यांचं कोणतही काम काँग्रेसने केलं नाही. काँग्रेसचे खोटे दावे केवळ घुसखोरीला परवानगी देणारे आहेत. काँग्रेस पक्ष सत्तेत येण्यासाठी काहीही करु शकतो,” अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

या प्रचारसभेमध्ये मोदींनी आसाममधील गरीबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साडेपाच लाख अर्ज आल्याचं सांगितलं. यापैकी काहींना पक्की घरं मिळाली आङेत. तर ज्यांना अद्याप घरं मिळालेली नाहीत त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यांनाही लवकरच घरं मिळतील, असा शब्द मोदींनी या सभेत दिला. काझीरंगाला आज काँग्रेसच्या ताब्यातून सोडवलं अशून आता आसामला सध्या बेकायदेशीर दावा सांगणं, अराजकता यासारख्या गोष्टींपासून सुटका मिळालीय. विकास कामांच्या माध्यमातून प्रगतीचे पूल बांधले जात आहेत, असंही मोदी म्हणाले.

आसामची ओळख आणि संस्कृती मिटवण्याची इच्छा असणाऱ्यांसोबत काँग्रेस आहे असा टोलाही मोदींनी लगावला. मी इथं तुम्हाला जागं करण्यासाठी आलो आहे. काँग्रेस पक्ष मतांसाठी काहीही करू शकतो. ते कोणाही सोबत सत्तेत जातील. मात्र आसामचे लोकं त्यांची संस्कृती नष्ट होऊ देणार नाहीत, असंही मोदी म्हणाले.  आसाममध्ये काँग्रेस डाव्या पक्षांसोबत युतीमध्ये आहेत. याच डाव्या पक्षांना काँग्रेसचे नेते केरळमध्ये जाऊन शिव्या देतात. काँग्रेसचा हा मोठा खोटारडेपणा घुसखोरीची शाश्वती देतो, अशी टीका मोदींनी केली.

आसाममधील चहालाही जगभरात पोहचण्याऐवजी त्याचा नाश करण्याचं काम काँग्रेस पक्षानं केल्याची टीका मोदींनी केली. भाजपाने आसाममधील निवडणुकीसाठी जो जाहीरनामा सादर केलाय त्यामध्ये आसामची संस्कृती वाचवण्याबरोबरच राज्याला आत्मनिर्भर करण्यासंदर्भातील शब्दही आम्ही दिलाय, असंही मोदींनी आसामी जनतेला सांबोधित करताना सांगितलं.