भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप

बीड : भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीवर अपक्ष उमेदवार कालिदास आपेट व काँग्रेसचे दादा मुंडे यांनी दाखल केलेले आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अस्तिककुमार पाण्डेय यांनी फेटाळले आहेत. दरम्यान तक्रारदार दादा मुंडे यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच भाजप कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण प्रकरणी मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप करत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचे माध्यमांना सांगितले.

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर शेतकरी संघटनेचे अपक्ष उमेदवार कालिदास आपेट व काँग्रेसचे िहगोलीचे प्रभारी दादा मुंडे यांनी बुधवारी सकाळी आक्षेप नोंदवले. कालिदास आपेट यांनी प्रीतम मुंडे यांचे परळी विधानसभा मतदारसंघात भाग क्र. ४१ मध्ये ५८५ क्रमांकावर आणि मुंबईमधील वरळी मतदारसंघाच्या भाग क्र.५५ मधील ११४० या क्रमांकावर अशा दोन ठिकाणी मतदार म्हणून नावे असल्याचा दावा केला होता. तर डॉ. मुंडे यांनी मतदारांना भावनिक आवाहन करण्यासाठी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव स्वतच्या नावापुढे लावत असून त्यांचे आर्थिक व व्यावसायिक व्यवहार प्रीतम गौरव खाडे या नावाने असल्याचे पुरावेही त्यांनी दिले. प्रीतम गौरव खाडे नावाने काढलेला टॅन क्रमांक त्यांनी २०१५ ते २०१७ या वर्षांचे आर्थिक हिशोब वेळेत सादर न केल्याने तो २०२२ पर्यंत रद्द केल्याचा आक्षेप नोंदवला. स्थावर मालमत्तेत वरळी येथील फ्लॅट, वैद्यनाथ अर्बन बँक संचालक म्हणून दाखल असलेल्या गुन्ह्यंची माहिती लपवल्याचेही नमूद केले होते. सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व आक्षेप फेटाळून लावले. काँग्रेसचे दादा मुंडे यांनी प्रीतम मुंडे व गौरख खाडे यांनी एका कंपनीत गुंतवलेल्या शेअर्सची माहिती शपथपत्रात दिली नसल्याचा आक्षेप दाखल केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हाही आक्षेप फेटाळून लावला. आक्षेप फेटाळल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर जात असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी दादा मुंडे यांच्यावर हल्ला करत बेदम मारहाण केली.

यापूर्वीही हल्ल्याचा प्रयत्न

मारहाणीनंतर दादा मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरूनच आपल्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वीही आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप करत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.