तुम्हाला याचे आश्चर्य वाटेल. काही जणांना यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. पण हे खरं आहे. सध्या देशात लोकसभेच्या ५४३ जागांसाठी मतदान सुरु आहे. काँग्रेस हा देशातला सर्वात जुना पक्ष आहे. पण या देशात असा एक लोकसभा मतदारसंघ आहे. जिथे काँग्रेसला कधीही विजय मिळवता आलेला नाही. केंद्रात जवळपास ६० पेक्षा जास्त वर्ष काँग्रेसची सत्ता होती. अनेक राज्यांमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर होते.

पहिली लोकसभा निवडणूक झाल्यानंतर तब्बल २६ वर्षांनी केंद्रात पहिल्यांदा बिगर काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. तीन वर्षात पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली. स्वातंत्र्यानंतर देशात सर्वाधिक काळ काँग्रेसने सत्ता उपभोगली. पण या देशात असा एक लोकसभा मतदारसंघ आहे. जिथे कधीच काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला नाही. १९५१ साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ते २०१४ पर्यंत केरळमधील पोन्नानी लोकसभा मतदारसंघात कधीच काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवलेला नाही.

पोन्नानी हे केरळमधील किनारपट्टीवर वसलेले एक छोटेस शहर आहे. एकेकाळी मसाल्याच्या व्यापारासाठी हे शहर प्रसिद्ध होते. इथल्या मसाल्याच्या व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोर्तुगीजांनी अनेकदा पोन्नानीवर हल्ले केले. आज पोन्नानी मासळीसाठी ओळखले जाते. पहिल्या १९५१ सालच्या लोकसभा निवडणुकीत पोन्नानीमधून किसान मजदूर प्रजा पार्टीचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर १९६२, १९६७ आणि १९७२ मधून डाव्या पक्षाच्या उमेदवाराने विजय मिळवला आणि १९७७ ते २०१४ तब्बल ११ वेळा इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या उमेदवाराने पोन्नानी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

१९५१ साली पोन्नानी बहुसदस्यीय लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून दोन खासदार लोकसभेवर पाठवण्यात आले. एका जागा सामान्य वर्गासाठी तर एका जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती. १९५१ मध्ये जे दोन खासदार लोकसभेवर पाठवण्यात आले. त्यातील एक खासदार किसान मजदूर प्रजा पार्टीचा तर एक काँग्रेसचा होता. काँग्रेसने दोन उमेदवार उभे केले होते.

करुणाकारा मेनन हे सामान्य वर्गातून तर इचीरन अय्यानी यांना अनुसूचित गटातून उमेदवारी देण्यात आली होती. निकाल जाहीर झाले त्यावेळी किसान मजदूर पार्टीच्या केलाप्पन कोयाहापाली यांना सर्वाधिक १ लाख ४६ हजार ३६६ मते मिळाली. त्यापाठोपाठ मेनन यांना १ लाख ३६ हजार ६०३ मते मिळाली आणि अय्यानी यांना १ लाख २० हजार २१४ मते मिळाली.

केलाप्पन सर्वाधिक मते मिळवून सामान्य गटातून खासदार म्हणून विजयी झाले. अय्यानी मते मिळवण्यात तिसऱ्या क्रमांकावर असूनही अनुसूचित गटातून खासदार म्हणून ते लोकसभेवर गेले. पोन्नानीमधून काँग्रेसचा उमेदवार लोकसभेवर गेला. पण आतापर्यंत काँग्रेसला कधीही इथे निवडणूक जिंकता आलेली नाही.