काँग्रेसने अनेक वेळा घटनादुरुस्ती केली. मात्र, आता त्याच पक्षाकडून भाजपच्या नावाने मुस्लीम-दलितांना घटनादुरुस्तीची भीती दाखवली जात आहे. देशात गरिबांच्या जिवावर सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने त्यांचे कधीही भले केले नाही. दर पाच वर्षांनी गरिबी हटावचा नारा दिला जातो. काँग्रेस कार्यकर्त्यांची तेवढी गरिबी हटली, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केली. पैठण येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

भाजप घटना बदलेल, असे नेहमी म्हटले जाते. पण काँग्रेसने ८० वेळा घटनादुरुस्ती केली आणि आज घटनेच्या नावाने दलितांमध्ये त्यांच्याकडून भीती निर्माण केली जात आहे. गैरसमज निर्माण केले जातात.

गंगा साफ केली नसती, तर प्रियंका गांधी वाराणसीत गेल्या नसत्या. मी घोषणा करणारा नेता नाही. मराठवाडय़ातील पाणीप्रश्न सुटला पाहिजे, असे म्हणत गडकरी यांनी महाराष्ट्रात पुढील काळात ५० टक्के जमीन सिंचनाखाली येईल, असे सांगितले.

जे प्रकल्प काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लटकवत ठेवले होते, ते पुन्हा सुरू केले असल्याचा दावा त्यांनी केला. या वेळी रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.