जुनागड : काँग्रेसने तुघलक रोड निवडणूक घोटाळा केला असून त्यात गरीब व गर्भवती महिलांसाठी असलेल्या जनतेच्या पैशांची लूट करण्यात आली, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत केला.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या खासदार म्हणून दिल्लीत असलेले १ तुघलक रोड निवासस्थान किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या १२ तुघलक लेन या अधिकृत निवासस्थानाकडे त्यांचा रोख होता, असे दिसून येते. प्राप्तिकर खात्याने अलिकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांच्या आस्थापनांवर चार राज्यांत रविवारी छापे टाकले होते. त्याचा संदर्भ पंतप्रधानांच्या वक्तव्यास होता.
गुजरातमधील जुनागड येथे प्रचार सभेत त्यांनी सांगितले, की काँग्रेस पक्ष हा अनेक घोटाळ्यांसाठीच प्रसिद्ध आहे. आता त्यांचा नवा घोटाळा उघड झाला असून त्याचे पुरावे आहेत. काँग्रेसने तुघलक रोड निवडणूक घोटाळा केला आहे. त्यात गरीब व गर्भवती महिलांसाठी असलेला जनतेचा पैसा नेत्यांनी लुटला आहे. कुणी कितीही गंभीर गुन्हा केला, तरी त्याला जामीन मिळाला पाहिजे, असे काँग्रेसने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले आहे. ही तरतूद ते त्यांच्या नेत्यांसाठी करू इच्छितात कारण आमच्या सरकारने त्यांना पाच वर्षांत तुरुंगाच्या दारात आणले आहे. त्यांना आत जावे लागणार आहे.
कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांवरील छाप्यांबाबत त्यांनी सांगितले, की कर्नाटक, मध्य प्रदेश ही राज्ये आता काँग्रेससाठी नवीन एटीएम यंत्रे आहेत. राजस्थान व छत्तीसगडमधील परिस्थिती वेगळी नाही. लोकांना लुटण्यासाठी काँग्रेसला सत्तेवर येण्यात रस आहे.
जेव्हा आम्ही पाकिस्तानात हल्ले केले, तेव्हा त्याचा भारतातील विरोधी पक्षांना राग आला, पण देश सुरक्षित असेल, तरच तो प्रगती करू शकतो. मोदी दहशतवाद घालवण्यासाठी पदावर आहे पण त्यांना मला पदावरून घालवायचे आहे. गुजरातचा पुत्र व तुमच्या चौकीदाराबाबत (मोदी) काँग्रेसने सर्व वाईट शब्द वापरले आहेत.
‘नेहरू गंमत पाहत बसले!’
काश्मीरमध्ये फुटीरतावाद जोपासणाऱ्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान असावा, ही मागणी करणाऱ्यांचा काँग्रेस मित्र आहे. आमचे जवान लोकांच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देत आहेत. असे कुठलेही राज्य नाही जिथले जवान हुतात्मा झालेले नाहीत, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, की सरदार पटेल यांनी लष्कराला संस्थानांच्या विलीनीकरणावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यास सांगितले, त्या वेळी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू गंमत पाहत बसले. सरदार पटेल नसते तर आज काश्मीर आपल्यात दिसला नसता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2019 1:12 am