भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखणे हा काँग्रेसचा गेम प्लान नसून, 2002 मध्ये उत्तर प्रदेशात सत्ता मिळवणे हे त्यांचं मुख्य लक्ष्य असल्याचं समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने देशहितासाठी जागांचं बलिदान दिलं.

‘सुरुवातीपासून आमचं ध्येय ठरलं होतं. बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलासोबत आम्ही युती केली, कारण आम्हाला सांप्रदायिक पक्षाला रोखायचं होतं. या प्रक्रियेत आम्हाला आणि बहुजन समाज पक्षाला काही जागांचं बलिदान द्यावं लागलं’, असं अखिलेश यादव यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

‘पण सध्या सुरु असलेल्या निवडणुकीत काँग्रेसचा अजेंडा भाजपाला केंद्रात सत्ता येण्यापासून रोखणे हा नाही. 2022 मध्ये उत्तर प्रदेशात आपला मुख्यमंत्री व्हावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत’, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. अखिलेश यादव यांनी काही दिवसांपुर्वी काँग्रेसवर टीका करत त्यांच्यात खूप इगो असल्याचं म्हटलं होतं. यानंतर त्यांनी आता हे वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पक्ष केंद्रात सरकार स्थापन करणार असून लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभा निवडणुकांवर (उत्तर प्रदेश) आपलं मुख्य लक्ष्य असेल असं सांगितलं होतं. राज्यातील शिक्षण, आरोग्य आणि रोजगार आपण सुधारणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. याच वक्तव्यावरुन नाराज होत अखिलेश यादव यांनी हे वक्तव्य केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बसपा आणि आरएलडीसोबत असलेली आपली युती घट्ट असल्याचं अखिलेश यादव यांनी सांगितलं आहे. देशाच्या भल्यासाठी दोन्ही पक्षांनी बलिदान दिलं आहे. भाजपा पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून अर्ध्याहून जास्त जागा आम्ही सोडल्या असल्याचंही त्यांनी म्हटलं. नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच सपा-बसपा युती तुटेल असं वक्तव्य केल्यासंबंधी विचारलं असता अखिलेश यांनी सांगितलं की, ‘भाजपाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्ही उत्तर प्रदेशात भक्कम असून भाजपा कुठेही नाही, आणि हे सत्य आहे’.