विधानसभा मतदारसंघनिहाय लोकसभेचा कौल

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शहरातील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघातून मतआघाडी घेणारे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांना २०१९ च्या निवडणुकीत उत्तर नागपूर (राखीव)मध्ये धक्का बसला आहे. येथे काँग्रेस उमेदवार नाना पटोले आघाडीवर आहेत. पूर्व, दक्षिण आणि दक्षिण-पश्चिमसह इतर पाच मतदारसंघात गडकरींनी जोरदार मुसंडी मारली आहे.

शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. शिवाय पाच वर्षांपासून भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. त्याचा फायदा गडकरींना होणार हे निश्चित होते. या निवडणुकीत एकूण २१ लाख ६० हजार २१७ मतदारांपैकी ११लाख ८२ हजार ५०७ ९(५४.७४ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ च्या तुलनेत किंचित मतदान कमी झाले असले  तरी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदात्यांची संख्या वाढली होती. हा वाढीव कौल या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणारा होता.  मतमोजणीनंतर हाती आलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारीवरून गडकरी यांना उत्तर नागपूरमध्ये फटका बसला आहे. येथे गडकरी यांना ८७,७८१ तर पटोले यांना ९६६९१ मते मिळाली.  विशेष म्हणजे, २०१४ मध्ये त्यांना येथून आघाडी मिळाली होती. सध्या येथे भाजपचेच आमदार आहे हे उल्लेखनीय.

पूर्व नागपुरातून भाजपच्या झोळीत भरभरून ‘कमळ’ पडले.  येथे गडकरी यांना १ लाख ३५ हजार ४५१ तर पटोले यांना केवळ ६० हजार ०७१ मते मिळाली. गडकरी यांना येथून तब्बल ७५ हजार ३८० मतांची आघाडी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिनिधित्व करीत असलेल्या दक्षिण-पश्चिममध्ये गडकरींना ५५ हजार ११६ इतके मताधिक्य आहे. गडकरींना १ लाख २० हजार १८५ आणि पटोले यांना ६५ हजार ६९ मते मिळाली. दक्षिण नागपुरातून भाजपला धक्का बसेल असे सांगितले जात होते.  मात्र ,येथे गडकरी यांना  ४३ हजार ५२४ चे मताधिक्य आहे. मात्र २०१४ च्या तुलनेत त्यात घट झाली आहे.  या मतदारसंघात गडकरी यांना १ लाख १४ हजार ९४५ आणि पटोले यांना  ७१ हजार ४२१ मते मिळाली.

मध्य नागपूर या हलबा व मुस्लीमबहुल मतदारसंघातून गडकरी यांना २२ हजारांची आघाडी आहे. हलबा आरक्षण आणि मुस्लिमांची नाराजी यावेळी भाजपला भोवणार असे निवडणुकीपूर्वीचे चित्र होते. ते निकालात दिसून आले नाही. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात २७ हजारांची आघाडी आहे.

२०१४ च्या निवडणुकीत सहाही मतदारसंघात भाजप आघाडीवर होती. पूर्व आणि दक्षिण-पश्चिमध्ये सर्वाधिक मते मिळाली होती. पूर्वमध्ये गडकरी यांना एक लाख १२ हजार ९६८ मते मिळाली होती, तर काँग्रेसला ४७ हजार २२६ मते प्राप्त झाली होती. दक्षिण-पश्चिममध्ये गडकरी यांना एक लाख सहा हजार ७२५ आणि मुत्तेमवार यांना ४४ हजार दोन मते मिळाली होती.

विधानसभानिहाय मिळालेली मते

१) दक्षिण-पश्चिम- १,२०१८५ (गडकरी), ६,५०६९ (पटोले)

२) दक्षिण- ११,४९४५ (गडकरी), ७१,४२१ (पटोले)

३) पूर्व- १३,५४५१ (गडकरी), ६०,०७१ (पटोले)

४) मध्य- ९६,३४६ (गडकरी), ७३,८४९(पटोले)

५) पश्चिम- १,०२९१६ (गडकरी), ७५,६६४ (पटोले)

६) उत्तर- ८७,७८१(गडकरी), ९६,६९१ (पटोले)

२ लाख १६ हजारांचे मताधिक्य

गडकरी यांना सहा लाख ६० हजार २२१ आणि पटोले यांना चार लाख ४४ हजार २१२ मते मिळाली. गडकरी यांचा दोन लाख १६ हजार नऊ मतांनी विजय झाला. २०१४ मध्ये गडकरी यांनी दोन लाख ८४ हजार ८२८ मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी गडकरी यांनी पाच लाख ८७  हजार ७६७ मते आणि मुत्तेमवार यांना तीन लाख दोन हजार ९३९ मते प्राप्त झाली होती.